वरळीला राजकीय सुगीचे दिवस, वरळीत होणार आता चार आमदार

विधान परिषदेसाठी शिवसेनेने सचिन अहिर यांना उमेदवारी दिली आहे

Updated: Jun 8, 2022, 07:01 PM IST
वरळीला राजकीय सुगीचे दिवस, वरळीत होणार आता चार आमदार  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहिर निवडून आल्यास वरळीत एक कॅबिनेट मंत्रीपदासह चार आमदार होणार आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघाचा त्याग केल्याच्या बदल्यात सुनील शिंदे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आहे. त्यानंतर आता नंबर आहे सचिन अहिर यांचा. वरळीत प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांना शिवसेनेत घेवून आदित्य ठाकरे यांनी आपला आमदारकीचा मार्ग सुकर केला होता.

त्यामुळं सचिन अहिर यांना या त्यागाची बक्षिसी सुरूवातीला भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्षपद देवून केलं आणि त्यानंतर आता विधान परिषदेची उमेदवारी शिवसेनेने दिलीय. शिवसेनेचे संख्याबळ पाहता त्यांच्या विजयात काही अडचण येईल असं वाटत नाही.
वरळीत राहणारे चौथे आमदार आहेत भाजपचे सुनील राणे. परंतु ते बोरीवली विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत. सुनील राणे यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर वरळी विधानसभा लढवली होती. परंतु तिथं त्यांचा पराभव झाला होता. 2017 मध्ये त्यांना भाजपने सुरक्षित अशा बोरीवलीतून तिकीट दिले आणि ते तेथून सहज निवडून आले.

वरळीची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आहे. इथले सहाही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तसंच किशोरी पेडणेकर यांच्या रूपाने अडिच वर्षे महापौरपदही वरळीतच होते. सेेनेचे विभागप्रमुखपद आशिष चेंबुरकर यांच्याकडे असून तेही वरळीतच राहतात. आशिष चेंबुरकर बेस्ट कमिटीचे अध्यक्षही होते.

वरळी ए प्लस करण्याचे स्वप्न आदित्य ठाकरे यांचे आहे. त्यादृष्टीने वरळीचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्या सुरूय. वरळीचा विकास होत असला तरी जनतेची वैयक्तिक कामे करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे भेटत नसल्याची तक्रार लोकांची आहे. त्यामुळेच आता जनतेची वैयक्तिक कामे करण्यासाठी आता सुनिल शिंदे आणि सचिन अहिर हे दोन आमदार उपलब्ध होणारेत. वरळीत येत असलेली राजकीय पदे पाहता वरळीला सध्या राजकीय सुगीचे दिवस आलेत असंच म्हणावे लागेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x