नांदेड लोकसभा निकाल 2024: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...

नांदेड लोकसभा निकाल 2024 News in Marathi: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...: नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. अशातच आता अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात (Nanded Loksabha) वसंतराव चव्हाणचा विजयाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Jun 4, 2024, 04:15 PM IST
नांदेड लोकसभा निकाल 2024: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले... title=
Nanded Lok Sabha Election Result 2024

Nanded Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणूक निकालांचा (Lok Sabha Election Result) सध्याचा कल पाहता इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसतंय. सत्ताधारी एनडीएला 300 च्या आत जागा मिळतील आणि भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसतंय. सत्ताधारी एनडीएला 296 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीला जवळपास 228 जागांवर आघाडी मिळतेय. सर्वांना आता अंतिम निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharastra Loksabha) मोठे उलटफेर होताना दिसत आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये पुन्हा काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) विजयाच्या मार्गावर आहे. अशातच आता अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय का? असा सवाल विचारला जातोय.

वसंतराव चव्हाण काय म्हणाले?

नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सोळाव्या फेरी अखेर त्यांना जवळपास 46 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या फेरीपासून काँग्रेसने घेतलेली आघाडी सोळाव्या फेरीपर्यंत कायमच आहे. त्यामुळे पुढंही ही आघाडी कायम राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना भेटण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश लोकांना रुचला नाही, लोकांच्या संतापाचा फायदा मला झाला. त्यासोबतच मुस्लिम मतदारांची वाढलेली टक्केवारी आणि मराठा आंदोलनामुळे मला फायदा झाल्याची प्रतिक्रिया वसंतराव चव्हाण यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील बरीच राजकीय समीकरणं बदलली असून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले एकत्र आल्याने नांदेडची जनता कोणाला कौल देणार? असा सवाल विचारला जात होता. तसं पहायला गेलं तर भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे समर्थक चिखलीकरांना मतदान करणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एन्ट्री चिखलीकरांच्या पराभवाला कारण ठरली का? असा सवाल देखील विचारला जातोय.

दरम्यान, 2014 मध्ये मोदी लाटेतही काँग्रेसचे अशोक चव्हाण खासदार झाले. त्यांनी भाजपच्या दिगंबर पाटलांना 81 हजार मतांनी हरवलं. मात्र, 2019 साली नांदेडकरांनी अशोक चव्हाणांना आपटी दिली. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांना 40 हजार मतांनी धोबीपछाड दिली होती. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांनीच भाजपला घरचा आहेर दिलाय, अशी चर्चा होताना दिसत आहे.