कोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट बंद; जीव धोक्यात घालून घाटात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची भन्नाट शक्कल

पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jul 14, 2024, 09:03 PM IST
कोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट बंद; जीव धोक्यात घालून घाटात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची भन्नाट शक्कल  title=

Raigad Pune Varandha ghat : पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी  31 ऑगस्टपर्यंत बंद असल्याचा आदेश काढुनही वाहन चालक जीव धोक्यात घालून घाटातून प्रवास करतायत. त्यामुळे अखेर रायगड प्रशासनाने घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची बॉर्डर असलेल्या ठिकाणी रस्त्यावर JCB च्या सह्याने मोठं मोठे दगड आणि बॅरिगेट्स लावून रस्ता  वाहतुकीसाठी  बंद केलाय.   अनुचित दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय  घेतलाय. 

रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वरंध घाट 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वहातुकीसाठी बंद करण्याची अधिसुचना रायगड जिल्हाधिकारी यांनी जारी केली आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीदरम्यान दरड कोसळून रस्ता खचला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे.  पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्याने जिवीत व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. 

सद्य:स्थितीत वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा राष्ट्रीय महामार्ग दिनांक 31ऑगस्ट 2024 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.  प्रवासी पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. कोकणातून पुण्याकडे येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांना ताम्हाणी घाट मार्गे प्रवास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड -कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.