Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची तहान भागवणा-या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर आलाय.. मात्र धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईतील पाणीकपात कायम राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणा-या ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसंच आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, धरणांतील पाणीसाठ्यात आता वाढ होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावाच लागणार आहे.
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी 3,900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांत 3 लाख 61 हजार 825 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणी चिंतेने ग्रासले होते. तसेच, धरणांनी तळ गाठल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महानगरपालिकेने 5 जूनपासून दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे, भिवंडी – निजामपूर महानगरपालिका व आसपासच्या गावांनाही ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, धरणांतील पाणीसाठ्यात आता वाढ होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.
मोडकसागर धरणातील पाणीसाठा आता 34.42 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, तानसामधील पाणीसाठा 49.99 टक्के, मध्य वैतरणातील 23.89 टक्के, भातसातील 26.66, विहारमधील 45.71, तुळशीतील 66.24 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.