छत्रपतींची ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

Updated: Oct 11, 2022, 06:22 PM IST
छत्रपतींची ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया    title=

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. सोमवारी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळे शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे. अशातच यावर शिंदे गटाने आपली प्रतिक्रिया दिली असून यावर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी ढाल तलवार हे चिन्ह शुभ शकून असल्याचं म्हटलं आहे.  (Two Sword and Shield decide Eknath Shinde Party first statement marathi news)
 
आमच्या सभांना महाराष्ट्रांचं आराध्यदेवत शिवरायांना अभिवादन करून सुरूवात होते. त्यामुळे ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून आहे. ढाल तलवार विरूद्ध मशाल हा सामना नाही तर बाळासाहेबांची शिवसेना विरूद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेने ठरवायचं आहे की कोणासोबत राहायचं, असं किरण पावसकर म्हणाले. 

संबधित बातमी एकनाथ शिंदे गटाला मिळालं हे चिन्ह, निवडणूक आयोगाकडून घोषणा

आम्ही तीन पर्याय दिले आहेत त्यातील आम्हाला कोणतेही चिन्ह मिळालं असतं तरी चाललं असतं. मात्र आम्हाला ढाल तलवार मिळाली हे आमचे नेते शिंदे साहेबांसाठी चांगलं आहे, असंही पावसकर म्हणाले.  

निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी सकाळी 10 वाजता पाठवायची होती. त्यानुसार शिंदे गटाने ई-मेल करत तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड ही चिन्हं निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केली होती. निवडणूक आयोगाने यापैकी ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.