नवी मुंबई : Three corporators joined BJP in Navi Mumbai, Bump to Eknath Shinde : भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दे धक्का दिला आहे. शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचे इन्कमिंग सुरुच आहे. असे असताना शिंदे गटातील नगरसेवकांना भाजपात आणण्यात गणेश नाईक यशस्वी झालेत.
नवी मुंबईतील दिघा येथील नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन शिवसेनेला मोठा हादरा दिला आहे. शिवसेना फुटली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट फोडल्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहे. गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप नगरसेवकांनी प्रवेश केला होता. जवळपास भाजपचे 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते.
या भरतीत नवी मुंबईतील भाजपचे तीन नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. पण, आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केला आहे.