मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने

ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला.

Updated: Mar 6, 2023, 09:19 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने title=

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यात ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात पुन्हा एकदा राडा झालाय. ठाण्यातील शिवाई नगर (Thane Shivai Nagar) परिसरात शिवसेनेची शाखा (Shivsena Shakha) घेण्यावरून ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आमने-सामने आल्याने तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुन्हा एकदा शाखेचा वाद चिघळला. याआधी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातील शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचं पाहिला मिळालं होतं.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शाखेत प्रवेश
ठाण्यातील शिवाई नगर इथल्या शिवसेना शाखेजवळ संध्याकाळी आठच्या सुमारास एका कार्यक्रमानिमित्ताने शिंदे गटाचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्याबरोबर माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे देखील होते. त्यावेळी शिवाईनगर शिवसेना शाखेचं कुलुप तोडून नरेश म्हस्के आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेत प्रवेश केला आणि शाखेचा दरवाजा आतून बंद केला. ही गोष्ट कळताच ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शाखेसमोर दाखल झाले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले, तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांचा अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला.

तर त्यांनी दुसरं कार्यालय थाटावं - म्हस्के
शिवाई नगर शाखा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष त्यांच्या ताब्यात आहे. इथली सर्व काम प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात सुरु असतात, असं असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी केला आहे. शिवाईनगरचे नगरसवेक आमच्याबरोबर आहेत, यांना हौस असेल तर त्यांनी दुसरं कार्यालय थाटावं असं म्हस्के यांनी म्हटलं. ही शाखा आमची आहे, आम्ही त्यांची कोणतीही प्रॉपर्टी हडप केलेली नाही, शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता आहे, आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे त्यामुळे यावर आमचाच हक्क आहे, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. ठाण्यात आनंद दिघे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना वाढलेली आहे असंही म्हस्के यांनी सांगितलं.

असले प्रकार चुकीचे - केदार दिघे
सणासुदीच्या दिवसात असे प्रकार करणं चुकीचं असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दीघे (Kedar Dighe) यांनी म्हटलं आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टाने याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. कोणत्याही मालमत्तेबाबत दावा केला जाणार नाही, असं शिंदे गटाने सांगितलं होतं, असंही केदार दिघे यांनी सांगितलं.