Metro : कसारा, पनवेल, पालघर मधून मुंबई फक्त अर्ध्या तासात गाठता येणार; रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी जबरदस्त प्लान

Metro : मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुपरफास्ट मेट्रो रेल्वे निश्चितच मोठा दिलासा ठरू शकते.  रॅपिड ट्रान्सपोर्टमुळे मुंबईच्या वाहतूकीला गती मिळू शकते. 

Updated: Mar 6, 2023, 08:33 PM IST
Metro : कसारा, पनवेल, पालघर मधून मुंबई फक्त अर्ध्या तासात गाठता येणार; रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी जबरदस्त प्लान title=

Fast Metro in Mumbai : घरांच्या वाढत्या किंमतींमुळे आता मुंबई बाहेर लोकवस्ती वाढू लागली आहे. कसारा, पनवेल पासून ते अगदी पालघरपर्यंत लोक रहायला जावू लागले आहेत. मात्र, इथे राहणारे लाखो प्रवासी कामानिमित्ताने रोज मुंबईतच येत असतात. सध्या वाहतुकीच्या सुविधा पाहता अनेकांचा अर्ध्याहून अधिक वेळ हा प्रवासातच जातो. लवकरच चाकरमान्यांची या त्रासदायक प्रवासातून  सुटका होणार आहे.  कसारा, पनवेल, पालघर मधून मुंबई फक्त अर्ध्या तासात गाठता येणार आहे. रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी  (rapid transport) जबरदस्त प्लान तयार केला जात आहे. 

मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. या रॅपिड ट्रान्सपोर्टमुळे मुंबईबाहेरची शहरं गाठण्यासाठीची मोठी कसरत आता टळणार आहे. कर्जत, कसारा, पनवेल, पालघर फक्त अर्ध्या तासात गाठता येईल. ते देखील मेट्रोने. महामुंबईच्या वाहतुकीला वेग देण्यासाठी रॅपिड ट्रान्सपोर्ट अर्थातच जलद मेट्रोची चाचपणी झाल्याचं समजते.

कर्जत, कसारा, पनवेल, पालघर, ठाणे-डोंबिवली ही लांब अंतरावरची स्टेशन्स मेट्रोने जोडण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिका-यांनी दिल्लीच्या जलद मेट्रो प्रकल्पालाही भेट दिली. यावेळी जलद मेट्रोचा नेमका उपयोग जाणून घेतल्याचं व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेंनी म्हटले. दिल्लीतील हा जलद मेट्रो प्रकल्प यशस्वी ठरला आहे. या जलद मेट्रोचा ताशी वेग 180 किमी प्रतितास असा आहे. यामुळे हा जलद मेट्रो प्रकल्प लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरु शकतो. 

मुंबईतील बहुतांश मेट्रो कॉरिडॉर बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. मुंबईत मेट्रोची फक्त एक लाईन म्हणजेच वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर किंवा ब्लू लाईन कार्यरत होती. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  2 A आणि 7 चे उद्घाटन झाले. लाईन २ A डीएन नगर अंधेरी हदीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीसर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करतो. सध्या मेट्रोच्या तीन मार्गिका सुरू झाल्या आहेत. 

तर, मुंबईत जवळपास आठ मार्गिकांचे काम सुरू आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्याअंतर्गत  एकूण 14 मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे. याद्वारे मुंबई शहर, उपनगरासह महामुंबई क्षेत्र एकमेकांशी जोडले जात आहे. यात मुंबईच्या भुयारी मेट्रो प्रकल्पासह ठाणे मेट्रो प्रकल्पाचा देखील समावेश आहे.