आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : शिवसेनेच्या फायरब्रँड महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. सुषणा अंधारे या आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांवर टीका करतात. चंद्रपुर येथील भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जीवा धोका आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
आपला घातपात होऊ शकतो अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलीय. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्यानं घात किंवा अपघात घडविला जाऊ शकतो अशी माहिती अधिका-यांकडून मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय. सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या बुलंद तोफ ओळखल्या जातात. मात्र त्यांनी घातपाताची भीती व्यक्त केल्यानं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात सुषमा अंधारे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे होते व्याख्यान, चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे यांनी सभांचा धडका लावला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी कायद्याच्या भाषेतच यावर प्रतिक्रिया दिली होती.
गुन्हा दाखल नंतर देखील जीवाला धोका असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.. माझ्यावरती केस किंवा हल्ला होऊ शकतो अशी माहिती मला देण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले होते.
अंधारे यांना पोलिस संरक्षणाची देखील विचारणा करण्यात आली आहे. मात्र, मी या इनपूटकडे लक्ष न देता माझे काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी जीवाला धोका असल्याची भिती व्यक्त केलेय.