मुंबई : भाजपमधील आक्रमक चेहरा आणि भाजप - शिवसेना युती तोडण्याची घोषणा करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पहिला यादीत भाजपकडून स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, असे असले तरी खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज आजच दाखल केला आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे खडसेंचं पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'झी २४ तास'शी बोलताना त्यांनी अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
पाच वर्षांपूर्वी ज्यांनी युती करण्यात किंवा तोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्या एकनाथ खडसेंचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. युती करायची असो, तोडायची असो. भाजपचे महत्त्वाचे नेते, फर्डे वक्ते, विधिमंडळात विरोधकांना भाषणानं घाम फोडणारा भाजपाचा एकेकाळचा फायरब्रँड नेता. एकनाथ खडसे. आज मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचंच नाव नाही. पण तरीही मुहूर्त होता म्हणून खडसेंनी फॉर्म भरुन टाकला.
अपराध माझा असा काय झाला, याचं उत्तर सध्या नाथाभाऊ शोधत आहेत. त्याचवेळी पक्षाशी प्रामाणिक राहणे हा गुन्हा असेल तर हो, मी गुन्हेगार आहे, असे नाथाभाऊंचं म्हणणे आहे. राजकारणात आशा संपत नाही, म्हणूनच नाथाभाऊ आजही वाट पाहतायत दुसऱ्या यादीची. दरम्यान, नाथाभाऊंचं असं होऊ नये, असे भाजप नेत्यांनाही वाटत आहे.
भोसरी एमआयडीसीतल्या भूखंडा प्रकरणानंतर पाच वर्षांच्या सत्ताकाळात खडसे यांच्या वाट्याला वनवासच आला. पाच वर्षांत जे घडलं ते सर्वांसमोर आहे. याला खडसेंच्या भाषेत म्हणायचं तर कालाय तस्मै नमः