विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : बारावीच्या परीक्षांचे (HSC Exam) अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची लेखी परीक्षा (Maharashtra HSC Board Exam 2023) 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सराव परीक्षांशिवाय अंतर्गत गुण नाही
बारावीच्या विद्यार्थ्यांना आता सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण मिळणार नाहीत, असा निर्णय शिक्षण मंडळाने घेतलाय. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. परीक्षेची भीती नाहीशी व्हावी, विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेच आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि लिखाणाचा सराव वाढवा या हेतून विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणदान केले जाणार आहे.
कोरोनाकाळातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
सध्या बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी हे कोरोना काळातील आहेत. 2021 मध्ये कोरोना काळात दहावीला असतानाही या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षादेखील झाल नव्हती. अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करत शिक्षण मंडळाकडून विषयनिहाय अभ्यासक्रम दिला आहे. मात्र बोर्डाच्या मुख्य परीक्षांआधी सराव परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटला आहे. त्यामुळे परीक्षेची भीती नाहीशी व्हावी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि लिखाणाचा सराव वाढवा या हेतूने विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे.
या सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण मिळणार असल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबतचा निर्णय विभागीय शिक्षण मंडळाने संभाजीनगर अखत्यारीत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांना अनिवार्य करण्यात आला आहे. सराव परीक्षा घेऊन या परीक्षेतील मूल्यांकनानुसार वार्षिक परीक्षेसाठी अंतर्गत गुणदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संभाजीनगर आणि परिसरातून या सराव परीक्षांना चांगला प्रतिसाद मिळत असून 58 हजार विद्यार्थ्यांपैकी 56 हजार 700 विद्यार्थी सराव परीक्षा देत आहेत.