शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..."

Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडताना सुषमा अंधारे यांनी आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असताना विरोक्षी पक्षनेतेही काहीच बोलले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं.

शिवराज यादव | Updated: May 9, 2023, 06:59 PM IST
शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..." title=

Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्याला आलेले अनुभव सांगताना सुषमा अंधारे यांना अश्रू आवरत नव्हते. या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार श्रीनिवास पाटील (Srivinas Patil), पत्रकार आणि खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) उपस्थित होते. 

"मला भटक्या विमुक्तांच्या काही व्यथा मांडायच्या नाहीत, पण जागतिकीकरणात भटके जास्त विस्थापित झाले आहेत. इतक्या जाती आहेत तर काहींना अशीपण जात आहे का? असं आश्चर्य वाटतं. वडार पूर्वी गावगाड्यात पाटा, वरवंटा, जातं तयार करायचा. गावात ओरडून विकायचा, गाव त्याला बलुतं द्यायचं. पण आता कोणी पाटा, वरवंटा विकत घेत नाही. वडार पूर्वी दगड फोडायचा. तुम्ही एक दगड फोडून पाहिल तर डोळ्यात किती छर्रे जातात हे कळेल. संपूर्ण दिवसाला ढीग संपवायचे आणि सांगेल त्या आकाराचे खडी करायचे. पण स्ट्रोन क्रशरमुळे त्यांच्या हातातील काम केलं. आता मिक्सर आल्यामुळे पाटा, वरवंटा कोणी घेत नाही. गावात काम नसल्याने शहरात आल्यावर इथलं इंग्रजी त्यांना कळत नाही. हीच अवस्था दुरड्या, सुपं, टोपली तयार करणाऱ्यांची आहे," अशी खंत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. 

"शहरातील लोकांना वयाच्या पाचव्या, सहाव्या वर्षात संगणक हाताळायला मिळत आहे. पण यांना कुठे ते कळतं? मलाही माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागले तेव्हा पहिल्यांदा संगणक पाहायला मिळाला. विस्थापित झालेल्या भटक्यांमधील एखादा शिकतो, त्यांचा आधार मिळतो. असाच मला लक्ष्मण माने यांचा आधार मिळाला. 1991 मध्ये आमची ओळख झाली होती. मी त्यांना दादा म्हणते, आणि ते मला लेक मानतात," असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. 

"सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे असं दादांनी सांगितलं. कशी मिळणार संधी? मला पुरस्काराला बोलावलं आणि केतकरांबद्दलच बोलू लागल्याने माझा विसर त्यांना पडला का असं वाटू लागलं होतं. शेवटी भाईने आठवण करुन दिली. आता आमचाच दादा विसरु लागला असेल तर कसं करायचं आम्ही. दादाच विसरत असतील तर मग इतरांकडून काय अपेक्षा करणार," असा मिश्किल टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था 

"आमचे लोक संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करतात हे असंख्य वेळा सिद्ध झालं आहे. मी चळवळीतली असून शिवसेनेत कशी आली असा प्रश्न अनेकांना पडतो. मी कितीही ओरडून सांगितलं तरी मुख्य प्रवाहापर्यंत माझा आवाज पोहोचत नव्हता. मुख्य प्रवाहातील लोकांना माझे प्रश्न त्यांना कळतच नव्हते. मी जे प्रश्न मांडते ते माणसांचे प्रश्न आहेत असं त्यांना वाटतच नव्हतं. या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे," अशी खंत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता

"शरद पवारांसमोर बोलणं थोडं धाडसाचं आहे. पण आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर टिप्पणी करत असताना एकाही पोलीस स्थानकात त्याची तक्रार लिहून घेतली गेली नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. सार्वजनिक ठिकाणी हा सगळा कंटेंट आहे. सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी यासंबंधी प्रश्न विचारायला हवा होता. माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे," असं सांगताना सुषमा अंधारे रडत होत्या.

पुढे त्यांनी सांगितलं की "आमचा असाही कोणी आधार नाही. आम्ही मंत्रीपद वैगैरे डोक्यात ठेवून राजकारणात आलेलो नाही. भटक्यांना आधार असावा, आमचे प्रश्न मांडणारं कोणीतरी असावं यासाठी आलो आहोत. सगळे बोलतात माझ्या बोलण्यात रग आहे. याचं कारण माझ्यात धग आहे. पण लोक माझ्या बापापर्यंत जातात, वाटेल ते बोलतात". 

"ज्या जमिनीत मी उगवून आले ती कसदार आहे आणि आम्ही दमदार पद्धतीन उगवून आलो आहोत", असं सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्यासाठी लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. तसंच माझं संपूर्ण कुटुंब आज तुमच्यामुळे सुरक्षित आहे असं त्यांनी सांगितलं. 

"काही नेत्यांनी चार महिन्यांनी मेसेज पाहिले. पण तुमच्या स्वीय्य सहाय्यक सतीश राऊत यांनी मोठ्या भावासारखा फोन केला. पुढील सहा तासात मी दिल्लीत हजर होते. तुम्ही कुटुंब प्रमुखाप्रमाणे भेटलात. तुम्ही तातडीने मुंबईला पाठवलं," अशी आठवण सुषमा अंधारे यांनी सांगितलं. 

"आता जे आमदार म्हणून निवडून आले आहेत, शिंदे गटाली आमदार बायकांबद्दल इतकं अश्लाध्य पद्धीतने बोलतात, बाई म्हणजे पायातील वाहन असल्यासारखं वागतात. या सगळ्यांना सत्तेवरुन खाली खेचायचं असले तर महाविकास आघाडी हवी. त्यासाठी तुम्ही असायला पाहिजे. आम्ही एका पक्षाचा नेता असा स्वार्थी विचार करत नाही. स्थिर सरकार हवं आणि त्याशिवाय उद्योग येणार नाहीत आणि आमच्या मुला बाळांच्या हाताला रोजगार मिळणार नाही," असं आवाहन त्यांनी शरद पवारांना केलं.