Crime News : कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आणि सासऱ्याला संपवून गेला... पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

Crime News : आरोपी जावई आपल्या चार साथीदारांसह मध्यरात्री शेतात पोहोचला आणि त्याने धारदार कोयत्याने सासऱ्यावर वार केले. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झालाय

Updated: Jan 14, 2023, 12:31 PM IST
Crime News : कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आणि सासऱ्याला संपवून गेला... पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु title=

Crime News : सासरचे लोक बायकोला नांदवायला पाठवत नाही म्हणून जावयाने सासऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत (Sangli Crime News) घडलाय. सांगलीच्या जत तालुक्यातील दरीबड येथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. अप्पासो माल्लाड असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर आरोपी सचिन बळोळी यांच्या सह चार जण फरार आहेत. जत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

लग्नानंतर महिन्याभरातच वादाला सुरुवात

जत तालुक्यातील दरीबडची येथील मुलीचे सुमारे चार वर्षापूर्वी कर्नाटकच्या अथणी येथील ऐगळी गावातील सचिन रुद्राप्पा बळोळी यांच्यासोबत झाले होते. लग्नाच्या 1 महिन्यानंतर सचिन आणि मुलीमध्ये घरगुती कारणावरुन वादावादी होऊ लागला होती. चारित्र्याचा संशयावरुन सचिन हा पत्नीला वारंवार मारहाण करत होता. मुलीच्या माहेरच्या मंडळींनी अनेक वेळा पती-पत्नीमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटवतच नसल्यामुळे पत्नी सांगली येथे माहेरी परतली होती. 

पती पत्नीची एकमेकांविरोधात कोर्टात तक्रार

यानंतर पती सचिनने पत्नीच्या माहेरच्यांनी तिला परत पाठवावे यासाठी कोर्टात केस दाखल केली होती. दुसरीकडे मुलीच्या आई वडिलांनी जत कोर्टात घटस्फोटाकरता अर्ज केला होता. पाच महिन्यापूर्वी जत कोर्टात सुनावणीच्या वेळी जावई सचिन याने मुलीला तू नांदायला चल, नाही आलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी करत शिवीगाळ केली होती. यानंतर मुलीने जत पोलीस ठाण्यात पतीविरुध्द तक्रार दिली होती.

सासऱ्याचा कोयत्याने खून

दरम्यान, शुक्रवारी मुलीचे वडील आप्पासो हे शेतात ऊस तोडीचे काम करत असताना सचिन बळोळी हा त्याचा भाऊ मिलन रुद्राप्पा बळोळी आणि दोन अनोळखी व्यक्तींसह तिथे आला. त्यांच्या हातात धारदार कोयते होते. यानंतर आरोपींनी आप्पासो यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात आप्पासो यांचा मृत्यू झाला. जत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींचा शोध घेतला आहे.