पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...

Pune Porshce Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे. 

राजीव कासले | Updated: May 22, 2024, 08:31 PM IST
पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...  title=

Pune Porshce Accident : पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालय मोठा निर्णय दिला आहे.  अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं हा निकाल दिलाय. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने न्यायदंडाधिकारी  एम. पी. परदेशी यांच्यासमोर बाजू मांडली. तर अल्पवयीन तरुणाकडून वकील प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. निकालावेळी कोर्ट परिसरात पुणे पोलिसांचा  (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 75 हजार रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पित असलेले बारमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV) कोर्टात सादर करण्यात आलं.कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे एकूण 75 हजारचे बिल दिल्याची दारूचे बिल भरताना ऑनलाईन पेमेंट करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांनी कोर्टात दिले. पण बाल न्यायालयात अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करण्यासंदर्भात आणखीन वेळ लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सज्ञान घोषित करावं अशी मागणी कर्ज करणारा अर्ज दाखल केला होता. कोर्टात आज फक्त अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात ठेवावे या पोलिसांच्या मागणीवरच  युक्तिवाद करण्यात आला. याच मागणीवर निर्णय घेण्यात आला. 

मुलाच्या वडिलांना पोलीस कोठडी
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. त्याच्यासोबत पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकरलाही 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. सरकारी वकीलांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होता. त्याचबरोबर गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल फरार का झाले? असा सवालही सरकारी वकीलांनी विचारला. शिवाजी नगर कोर्टात तिघांनाही हजर करण्यात आलं होतं.

काय आहे नेमकं प्रकरण?
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचं लायसन्स नाही, हे माहिती असतानाही मुलाला कार चालवायला दिल्याचा ठपका विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्यावर ठेवण्यात आलाय.

एक बड्या बापाचा लाडाचा पोरगा.. 75 हजार रुपयांची दारु ढोसून बेदरकारपणे कार चालवत दोघांचा बळी घेतो.. याची चिड पुणेकरांमध्येच नाही तर देशवासियांमध्येही आहे.. त्याने ज्या दोघांना आपल्या कारखाली चिरडलं, त्यांच्या पालकांना न्याय मिळणार का याकडेच सर्वांचं लक्ष आहे.