विश्‍वास नांगरे पाटील यांच्‍या नावाने महिलेला 40 लाखांचा गंडा; अलिबागमधील धक्कादायक घटना

अलिबागमध्ये एका महिलेची 40 लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने या महिलेला गंडा घालण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 22, 2024, 07:03 PM IST
विश्‍वास नांगरे पाटील यांच्‍या नावाने  महिलेला 40 लाखांचा गंडा; अलिबागमधील धक्कादायक घटना  title=

Alibaug Crime News : फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. आता मात्र, बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या नावाने गंडा घातला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas nangare patil) यांच्या नावाने एका महिलेला 40 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. अलिबागमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत गंडा घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

आधारकार्डचा गैरवापर झाल्याची बतावणी करत महिलेला गंडा घालण्यात आला आहे. अलिबागमधील गोंधळपाडा येथील एक महिला या फसवणुकीला बळी पडली आहे.  शनिवारी (दि. 4) रात्री मोबाईलवर कॉल करून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात आरोपींनी विश्‍वास नांगरे पाटील यांच्‍यासारख्‍या वरीष्‍ठ पोलीस अधिकारयाचे नाव घेतल्‍याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

नेमकं काय घडलं?

फिर्यादी महिला तिच्या घरात असताना अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅपवरुन एका अज्ञात व्‍यक्‍तीने  कॉल  केला. टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरेटी ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. मोबाईल फोन बंद होणार आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर हा कॉल ट्रान्‍स्‍फर केल्‍याचे भासवले. त्याच नंबरवर दिक्षीत येडाम आणि विश्‍वास नांगरे पाटील हे पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी महिलेवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ईडी आर.बी.आय, मुंबई पोलीस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भिती निर्माण केली गेली. ईडी आणि इतर यंत्रणेच्या भितीने ती महिला बोलकी झाली. जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेचे बँकेतील सर्व माहिती घेऊन  तिच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन  40 लाख 73 हजार 719 रुपये काढून घेतले.  फसवणूक झाल्याचे लक्षात येण्यापूर्वी चोरट्यांनी तिच्‍या बँक खात्‍यावर ऑनलाईन दरोडा टाकून आर्थिक लूट केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.