Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला वेगळं वळण. अल्पवयीन मुलाच्या वडिलांमागोमाग आता आईच्याही अडचणींमध्ये वाढ. पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई     

अरूण म्हेत्रे | Updated: Jun 1, 2024, 09:13 AM IST
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक   title=
Pune Porsche Accident shivani agrawal mother of minor boy in crime branch custody

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणी आता 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईच्याही अडचणी वाढल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं कारवाई करत शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे. ब्लड सॅम्पल फेरफार आणि ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये तीन ते चार गुन्हे घडले असल्याची बाब आता समोर आली आहे. तरुण मुलाकडून घडलेला अपघात, त्यानंतर त्याच्या वडील आणि आजोबांकडून पुरावा नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न, पुढं अल्पवयीन मुलाच्या रक्त्याच्या नमुन्यांशी फेरफार, अहवालांमध्ये बदल या सर्व कृत्यांमध्ये अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसला. याशिवाय लाचखोरीचाही प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या घटनेशी संबंधीत प्रत्येकाचीच चौकशी होत होती. 

हेसुद्धा वाचा : फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update

 

पुण्यातील या अपघात प्रकरणामुळं अचडणीत आलेला अल्पवयीन मुलगा निरीक्षणगृहात असून, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे मात्र पोलिस कोठडीत आहेत. सदर गुन्हात आणि कटकारस्थानांमध्ये मुलाच्या आईचाही सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी करण्यात आली. विविध कारणांनी ही चौकशी सुरु ठेवण्यात आली होती. ज्यानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवालला अटक करण्यात आलं आहे. 

आज अल्पवयीन आरोपीची चौकशी 

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुणे पोलीस शनिवारी चौकशी करणार आहेत. बालहक्क न्यायमंडळाकडून पुणे पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळाली असून त्यानंतर शनिवार (1 जून 2024) रोजी पुणे पोलीस दोन तास त्याची चौकशी करतील. पालक उपलब्ध नसल्यानं बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होईल असं म्हटलं गेलं होतं. पण, शिवानी अग्रवालवर अटकेची कारवाई झाल्यानंतर तिला बाल निरीक्षण गृहात नेणार असल्याची माहिती आहे. आज मुलाची चौकशी होणार असल्या कारणानं त्यावेळी पालक सोबत असण्याची गरज पाहता हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

 

विशाल अग्रवालच्या अडचणींमध्येही वाढ 

इथं अल्पवयीन मुलाच्या आईवर अटकेची कारवाई झालेली असतानाच आता त्याचे वडील, विशाल अग्रवालच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा प्रशासनानं विशाल अग्रवालला दणका दिला आहे. कारण, महाबळेश्वरमधील MPG क्लब हॉटेल सील करणार असल्याचं कळत आहे. झी २४ तासच्या वृत्तानंतर हे कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 2 दिवसांपूर्वी हे हॉटेल बार जिल्हा प्रशासनानं सील केला होतं. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी कारवाईचे हे आदेश दिले.