Pune News : नव्या वर्षात पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार आहे. पुण्यात आला ओला, उबरमधील थंडागर प्रवास 20 टक्क्यांनी महागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यक्षेत्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसाठी कुलकैब वातानुकुलीत टॅक्सींच्या भाडेवाढ करण्यात आली आहे. जवळपास 20 टक्क्यांची ही भाडेवाढ 1 जानेवारी 2024 पासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना ओला, उबरमधून प्रवास करताना अधिकचे जास्त पैसे द्यावे लागणार आहे.
पुण्यामध्ये एसी कॅबचे दर वाढवण्यासाठी टॅक्सी संघटनांनी अनेकदा आंदोलन केले होते. टॅक्सी संघटनांच्या आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पहिल्या दीड किलोमीटरसाठी 37 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये दराचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता नव्या वर्षापासून हे नवीन दर आता लागू झाले असून ओला, उबरसह इतर एसी टॅक्सीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
अशी असेल नवी भाडेवाढ
पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता सहा रुपयांची, तर त्या पुढील किलोमीटरसाठी चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दीड किलोमीटरसाठी 31 रुपयांऐवजी आता 37 रुपये द्यावे लागणार आहेत. तर त्यापुढील एक किलोमीटरसाठी 21 रुपयांऐवजी आता 25 रुपये मोजावे लागणार आहे. जवळपास 20 टक्क्यांची ही भाडेवाढ करण्यात आल्याने सामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.
याआधी गेल्या वर्षी 17 एप्रिलला काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली होती. या टॅक्सीसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी 31 रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरला 21 रुपये दर आकारण्यात आला होता. खटुआ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा वातानुकूलित कॅबला 20 टक्के दरवाढ करण्याची शिफारस केली होती. या शिफारशीनुसार एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी 37 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत.