विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सातत्याने चर्चेत असतात. याआधी देखील बोलताना सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबतही सत्तार यांनी केलेल्या विधानमुळे राजकीय वातावरण तापलं होतं. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकांना शिवीगाळ केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुन्हा एकदा शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अपशब्द वापरल्याने सत्तार पुन्हा वादात आले आहे. सत्तारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. मात्र लोकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे मोठा गोंधळ होत होता. लोकांची गर्दी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बराच वेळ गर्दी आवरत नसल्याने शेवटी अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेतला आणि लोकांना खाली बसण्याचे आवाहन केले. त्यानंतरही गर्दी ऐकत नसल्याने अब्दुल सत्तार यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
"पोलिसांनी लाठीचार्ज करा. इतकं मारं की त्यांची हाडं तुटतील. मारा त्यांना. साल्या तुझ्या बापाने कधी कार्यक्रम पाहिला होता का? तू राक्षस आहेस का? माणसाची औलाद आहे माणसासारखा आनंद घ्या. खाली बसल्यावर कार्यक्रम सुरु होईल नाहीतर रद्द केला जाईल. तुझ्या घरी असाच उभा राहतो का? तुझ्या आई वडिलांचा पिक्चर पाहतो का? खाली बस, यांना दुसरी भाषा कळतच नाही," अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी लोकांना खाली बसण्याचे आवाहन केले.
विजय वडेट्टीवारांची टीका
या सगळ्या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. "महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा ! मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का ? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?," असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण
"सिल्लोड शहरात रात्री गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये 60 ते 65 हजार लोक आले होते. तिथे विरोधी पक्षाचे काही लोक पाठवण्यात आले होते. कार्यक्रम उधळण्याचा कट होता. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी मी ग्रामीण भाषेत बोललो. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर त्याच्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. विरोधकांनी असे करु नये अशी विनंती आहे. हा शहराचा महोत्सव आहे. महिला, लहान मुले या कार्यक्रमासाठी येतात. ते सुरक्षित जावे म्हणून मी काही शब्दांचा वापर केला," असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.