Pune Crime News : जगभरात रविवारी मोठ्या उत्साहात नववर्षाचे (New Year 2023) स्वागत करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागलं आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याची दिसून येत आहे. खुलेआमपणे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रकार पाहायाला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातही (Pune News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला जीवघेणा हल्ला झाला आहे.
दारुच्या नशेत धक्कादायक कृत्य
पुण्यात दारुच्या नशेत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना हॅपी न्यू इयर (Happy New Year) म्हणत काही तरुण धिंगाणा घालत होते. यावेळी झालेल्या वादातून चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याचा हात मनगटापासून तोडला. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तरुणाचा हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मात्र तरुणासोबत घडलेल्या या प्रसंगामुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पंकज तांबोळी तरुणासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पंकज तांबोळी हा सीडॅक ए सी टी एस या इन्सिट्युटमध्ये डॅक कोर्स करत आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. हा प्रकार साई चौकात पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी आशुतोष अर्जुन माने (24, रा. दुर्वांकूर, पंचवटी, पाषाण) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
हॅप्पी न्यू इयर न म्हटल्याने तोडला हात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्याचे मित्र पंकज तांबोळी, साजीद शेख हे मेस बंद असल्याने साई चौकातील ईर्षाद हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर तिघेही हॉटेलबाहेर उभे होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण तिथे आले. दारुच्या नशेत ते सर्वांना जबरदस्तीने हॅप्पी न्यू इयर म्हणत होते. त्यावरुन तांबोळी आणि त्या तरुणांमध्ये काही वाद झाला. तेव्हा त्यांच्यातील एकाने आपल्या साथीदारांना तिथे बोलावून घेतले. साथीदार येताच पुन्हा वाद सुरु झाला. त्याचवेळी धक्काबुक्कीत एकाने पंकज याच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात पंकजचा हात मनगटापासून तुटला. यावेळी तुटलेला हात आणि रक्त पाहून हल्लेखोरांनी घाबरुन तेथून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताळलेला हात घेऊन पोलिसांनी तातडीने या तरुणाला शेजारी असलेल्या दवाखान्यात नेले. महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णालयाचे उद्घाटनही पार पडले नव्हते. मात्र दवाखान्यामधील डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवून प्राथमिक उपचार करुन त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठवले. तेथे या तरुणाच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले.