पुण्यात भाजप आमदाराकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, महिला अधिकाऱ्याचा आरोप

शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लीप व्हायरल, भाजप आमदाराचं स्पष्टीकरण, पाहा काय म्हणाले

Updated: Sep 26, 2021, 06:00 PM IST
पुण्यात भाजप आमदाराकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, महिला अधिकाऱ्याचा आरोप title=

अरूण म्हात्रे, झी मीडिया पुणे: पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेतील एका महिला अधिका-याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. सुनील कांबळे कॅन्टोन्मेंट विधासभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची ही सहा महिन्यांपूर्वीची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. 

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. तर भाजप आमदार सुनील कांबळेंनी मात्र हा आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत. ती कथित ऑडिओ क्लिप आपली नाही. त्यामुळं माफी मागायचा विषयच नाही, असं कांबळेंनी स्पष्ट केलं आहे.

सुनील कांबळे यांनी एका रखडलेल्या कामासंदर्भात कार्यकारी अभियंता पदावरील अधिकाऱ्याला फोन केला होता. काम का होत नाही याचा जाब विचारत असताना त्यांनी त्या महिला अधिकारी त्यांच्या वरिष्ठांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचं सांगण्यात आलं. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. 

या प्रकाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून कांबळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. ती कथित ऑडिओ क्लिप माझी नाही, त्या महिला अधिकाऱ्यांना मी ओळखत नाही. माझ्या विरोधात काही मिळत नसल्यामुळे विरोधकांनी क्लिप पुढे केली आहे. याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असून पोलिसांनी त्याची चौकशी करावी असं स्वत: आमदरा सुनील कांबळे म्हणाले आहेत. 

झी 24 तास या ऑडिओ क्लीपची कोणतीही पुष्टी करत नाही. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.