जेसीबीतून फुलं उधळण्याचा नवा ट्रेंड कोर्टाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी हल्ली बुलडोझर आणि इतर अनेक प्रकारच्या अवजड वाहनांचा सर्रास वापर होतो. हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचं सांगत त्यावर निर्बंध घालण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
जेसीबीतून फुलं आणि गुलाल उधळण्याची आता जणू फॅशन झाली आहे. गल्लीतला नेता असो की दिल्लीतला नेता... त्याच्या स्वागताला पाच पन्नास जेसीबी भरुन फुलं उधळणं हा जणू प्रोटोकॉल झाला आहे. जेसीबीतून फुलं आणि गुलाल उधळण्याच्या या नव्या प्रकाराला ओंगळवाण्या शक्तिप्रदर्शनाची किनार आहे. खरं तर जेसीबी हे अवजड वाहन आहे. प्रवासी वाहतुकीसाठी त्याचा वापर होत नाही. पण हजारोच्या गर्दीत जेसीबी फिरवले जातात. यामुळं जनसमुहाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळंच पुण्यातील वकील जतीन आढाव यांनी जनहीत याचिका दाखल केली आहे.
जेसीबीतून फुलं-गुलाल उधळण्यामुळं फक्त आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनाच धोका असतो असं नाही. तर आनंदोत्सव पाहणाऱ्यांच्याही जीवाला धोका होऊ शकतो असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे.
जेसीबीतून फुलं उधळण्याचा बडेजाव कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. कोर्टानं याचिका दाखल करुन घेणार आहे. त्यामुळं जेसीबीतून फुलं आणि गुलाल उधण्याचा हा ट्रेंड कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.