'माझा दोष फक्त इतकाच....' उपमुख्यमंत्री अजित पवारांची 'मन की बात'

NCP Chief Ajit Pawar:  शेतकरी, महिला, युवक यांना आपण अर्थसंकल्पातून कशी मदत केली, याची माहिती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 4, 2024, 04:01 PM IST
'माझा दोष फक्त इतकाच....' उपमुख्यमंत्री अजित पवारांची 'मन की बात' title=
Ajit Pawar

NCP Chief Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जनतेशी संवाद साधला. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपली बाजू मांडली. आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलीय. तरी विरोधक राजकारण करतायत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकरी, महिला, युवक यांना आपण अर्थसंकल्पातून कशी मदत केली, याची माहिती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली. तसेच आपल्याला काम करायचे असल्याचे ते म्हणाले.

मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला. त्यात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यातून महिलांना दरमहा 1500 मिळणार आहेत. यामुळे माता, भगिनींची विवंचना दूर होईल. महिला आर्थिकदृष्या, सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हायात अशी माझी मनापासून इच्छा आहे. ही योजना म्हणजे महिलांच्या दृष्टीकोनातून टाकलेलं क्रांतीकारी पाऊल टाकलं. यासोबत राज्यात 25 हजार नवीन उद्योगांसाठी आर्थिक तरतूद आहे. यात महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. युवकांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी स्टायपेंड दिले जाणार आहे. वारकरी बांधवांसाठी प्रति दिंडी 20 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

तुमचा दादा कामं करणारा

अनेक नकारात्मक लोकं अकारण टिका करतायत. हिणवलं जातंय. या लोकांच्यामध्ये आणि अजित दादांच्यामध्ये एक फरक आहे. हे लोकं राजकारण करणारे आहेत तर तुमचा दादा कामं करणारा आहे. 

पहिल्या दिवसापासून जनता हाच माझा 

राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदलला नाही. पार्टी बदलली नाही. पहिल्या दिवसापासून जनता हाच माझा पक्ष आहे. मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल हाच विचार माझ्या डोक्यात असतो. जे लोकं बजेटच्या नावाखाली नाकं मुरडतायत, त्यांचे चेहरे नीट बघून घ्या, हे तेच चेहरे आहेत, ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही. सरकारची योजना तुमच्या दारापर्यंत येऊ द्यायची नसल्याची टिका त्यांनी विरोधकांवर केली.

माझा दोष फक्त इतकाच 

मी अर्थसंकल्पात गोरगरिबांना 3 सिलेंडर गॅस मोफत देण्याची घोषणा केलीय. त्याबदल्यात मला शिव्या शाप मिळतायत.माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्याची दु:ख वेदना समजून घेतल्या. आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

 शेतकरी विरोधी कोण?

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 44 लाख शेतकऱ्यांच वीजबिल माफ केलं. हे सहन होत नाही. म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादकांना गेल्यावर्षी 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलंय. याला त्यांचा विरोध का? यावरुन कोण शेतकऱ्यांच्या बाजुने आणि कोण शेतकरी विरोधी भूमिका घेतंय हे तुमच्या लक्षात आलं असेलच, असेही ते म्हणाले. 

काम करणाऱ्यांना निवडून द्या

विरोधकांकडून तुम्हाला फूस लावण्याचा प्रयत्न होईल पण तुम्ही भुलू नका. तुमच्या दारी विकासाची गंगा कोणी आणली, कोण काम करतं? हे पाहा. भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून दूर राहा. काम करणाऱ्या नेत्यांनाच निवडून द्या असे आवाहन अजित पवारांनी जनतेला केले. 

आमचे हात बळकट करा

माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आले. एकही आरोप सिद्ध झाला नाही. भविष्यातही होणार नाही. विकासाच्या मॉडेलची पायभरणी आम्ही करतोय. यासाठी मला 13 कोटी जनतेची साथ हवीय. प्रगत महाराष्ट्रासाठी आमच्यासोबत या आणि आमचे हात बळकट करा असेही ते जनतेला उद्देशून म्हणाले.