RSS Mohan Bhagwat On Mandir Masjid Controversy: देशात मागील काही दिवासांपासून सातत्याने मंदिर-मशीद वाद सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशातील राजकीय वातावरण या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारल्यानंतर काही लोकांना असं वाटत आहे की असे मुद्दे वारंवार उपस्थित केल्यास ते हिंदूंचे नेते बनू शकतात, मात्र हे असे वाद निर्माण करणे स्वीकारता येणार नाही, असं विधान मोहन भागवत यांनी केलं आहे. मोहन भागवत यांनी थेट कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नसला तरी त्यांचं हे विधान भाजपाच्या अनेक आघाडीच्या नेत्यांसाठी सूचक इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वसमावेशक समाज का आवश्यक आहे याबद्दल भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी, आपला देश सद्भभावनेनं पुढे चालला आहे, हे जगाला दाखवून देण्याची गरज असल्याचं मत भागवत यांनी व्यक्त केला आहे. भागवत यांनी यावेळेस बोलताना, रामकृष्ण मिशनमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण असं करु शकतो कारण आपण हिंदू आहोत, असंही नमूद केलं.
हिंदू सेवा महोत्सव कार्यक्रामध्ये बोलताना भागवत यांनी मंदिर आणि मशिद वादाचाही उल्लेख केला. राम मंदिराच्या निर्मितीनंतर काही लोकांना असं वाटत आहे की, नव्या जागांवर अशाच प्रकारचे मुद्दे उपस्थित केल्यास ते हिंदुचे नेते बनू शकतात. मात्र कोणत्याही प्रकारे याचं समर्थन करता येणार नाही, असं भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं. भारतीय समाजातील विविधतेबद्दल बोलताना, आपण फार दिर्घ काळापासून एकमेकांसोबत सद्भावनेनं राहत आलो आहोत. आपल्याला जगाला सद्भावनेचा संदेश द्यायचा असेल तर आपल्याला हे अशापद्धतीने सद्भावनेनं राहणं गरजेचं आहे, असंही भागवत यांनी आवर्जून सांगितलं.
राम मंदिर हा सर्व हिंदुंच्या श्रद्धेचा विषय असल्याने त्याची निर्मिती करण्यात आली, असं भागवत म्हणाले. कोणत्याही एका ठराविक जागेचा उल्लेख न करता त्यांनी दर दिवशी वेगवेगळी प्रकरण चर्चेत आणली जातात. याची परवानगी कशी दिली जाते? हे असं सुरु नाही ठेवता येणार. आपण एकत्र आहोत हे भारताने दाखवणं गरजेचं आहे, असंही भागवत यांनी सांगितलं.
सरसंघचालकांनी पुढे बोलताना, बाहेरुन आलेले काही समूह आपल्यासोबत कट्टरता घेऊन आले. त्यांना त्यांचा जुना प्रशासनाचा काळ परत आणायचा आहे. मात्र आता देश संविधानानुसार चालतो. यामध्ये लोक आपल्या प्रतिनिधींना निवडतात. हे प्रतिनिधी सरकार चालवतात. सत्ता गाजवण्याचे दिवस गेले, असंही म्हणाले.