पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद

Nashik Crime : नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेले एटीएमच चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे मोठ्या तयारीने आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 9, 2023, 02:41 PM IST
पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime) एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेल्या एटीमध्ये (ATM) चोरी करण्यात आली आहे. एसबीआय बँकेचे हे एटीएम होते.  मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो यशस्वी होत नसल्याने चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलीस (Nashik Police) सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो. त्यामुळे याच संधीचा फायदा घेत सामनगाव रोड परिसरात असलेल्या आरपीएफ सेंटर जवळील एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना सकाळी नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक पिकअप व स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसली. तसेच एटीएम जवळच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता चोरटे एटीएम घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून या एटीएममध्ये किती रक्कम होती याबाबत अद्याप निश्चित आकडा समजू शकलेला नाही. मात्र एटीएम चोरणाऱ्या संशयतांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

मुंबईत 90 फूटांचा पूल चोरीला

एका नाल्यावर असलेला पूल चोरीला गेल्याचा प्रकार मुंबईतील मालाडमध्ये समोर आला आहे. चोरी गेलेला लोखंडी पूल हा 6 हजार किलो वजनाचा आणि नव्वद फूट लांब होता. या पुलावरुन अदानी इलेक्ट्रिसिटीची केबल जाणार होती. मात्र, एप्रिल महिन्यात कायमस्वरूपी पूल आल्याने तो पूल तिथून काढण्यात आला होता. पण त्यानंतर तो पूल चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी या पुलाची पाहणी करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना हा पूल गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास केल्यानंतर चार आरोपींना अटक केली आहे. पूल बांधणाऱ्यानेच हा पूल चोरी केला होता अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी चोरीचा सर्व माल जप्त केला आहे. आरोपींनी गॅस कटरच्या साहाय्याने पूल हळूच कापून काढला होता. त्यानंतर हळूहळू तो तिथून गायब केला.