पुण्यात लग्नाच्या नादात तरुणाने गमावले तब्बल 92 लाख रुपये; एका सल्ल्याने गमावली आयुष्याभराची कमाई

Crime News: पुण्यातील (Pune) एका तरुणाला तब्बल 92 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मॅट्रिमोनिअल साइटवर (matrimonial site) भेटलेल्या एका तरुणीने तरुणाची फसवणूक केली आहे. ही तरुणी घोटाळेबाज असल्याचं समोर आलं असून, तिने तरुणाला त्याचे सर्व पैसे गुंतवण्यास तयार केलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Jul 9, 2023, 01:56 PM IST
पुण्यात लग्नाच्या नादात तरुणाने गमावले तब्बल 92 लाख रुपये; एका सल्ल्याने गमावली आयुष्याभराची कमाई title=

Crime News: भारतात सध्याच्या घडली ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ऑनलाइन माध्यमातून लोकांनी कष्टाने कमावलेल्या पैशांवर गंडा घातला जात आहे. लोकांचे लाखो, करोडो रुपये अशाप्रकारे लंपास करण्यात आल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडायचं नसेल तर अज्ञातांवर विश्वास न ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. अशा लोकांवर विश्वास ठेवण्याआधी त्यांची पूर्ण माहिती मिळवणं गरजेचं आहे. त्यातही जर तुम्ही एखादी व्यक्ती सांगत आहे म्हणून पैसे गुंतवणार असाल तर आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका. यामुळे काही मिनिटात तुम्ही तुमच्या आयुष्यभराची कमाई गमावू शकता. कारण असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका तरुणासह घडला आहे. मॅट्रिमोनिअल साइटवरुन ओळख झालेल्या तरुणीचा सल्ला ऐकून गुंतवणूक केल्याने तरुणाने तब्बल 92 लाख रुपये गमावले आहेत. ही तरुणी नंतर घोटाळेबाजी असल्याचं समोर आलं आणि तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. 

आपल्या आयुष्याचा साथीदार शोधण्यासाठी अनेकांकडून मॅट्रिमोनिअल साईट्सचा वापर केला जातो. यावेळी अनेक अनोळखी लोकांशी ओळखी होतात. त्यांच्याही आपलं बोलणंही होत असतं. जोडीदार शोधत असल्याने अनेकजण समोरील व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण ही व्यक्ती अनोळखी आहे आणि आपल्याला त्याच्या किंवा तिच्याबद्दल जास्त माहिती नाही हे लोक विसरतात. काहीजण तर न भेटताच एकमेकांची निवड करुन मोकळे झालेले असतात. पण असं करणं योग्य नाही. त्या संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 

पुण्यातील एका आयटी कर्मचाऱ्याला एका तरुणीने 91 लाख 75 हजारांचा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयटी कंपनीत काम करणाऱ्या या तरुणाची फेब्रुवारी महिन्यात मॅट्रिमोनिअल साईटवरुन तरुणीची ओळख झाली होती. यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याची स्वप्नंही पाहिली होती. यानंतर तरुणीने तरुणाला 91 लाख 75 हजारांची गुंतवणूक करण्यास तयार केलं होतं. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅट्रिमोनिअल साईटवर भेट झाल्यानंतर तरुणीने पीडित तरुणाला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. यानंतर दोघांनी फोनवरुन बोलण्यास सुरुवात केली होती. तरुणीने तरुणाला 'blescoin' ट्रेडिंमगध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. लग्नानंतर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हे फायद्याचं आहे असं तिने सांगितलं होतं. तरुणाने तरुणीवर विश्वास ठेवला आणि काही बँकांकडून तसंच एका अॅपवरुन कर्ज घेतं. गुंतवणूक करण्यासाठी त्याने तब्बल 71 लाखांचं कर्ज काढलं होतं. 

फेब्रुवारी महिन्यापासून तरुण तिने दिलेले सल्ले ऐकत होता. त्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 86 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. हे पैसे 'blescoin' मध्ये गुंतवले जात आहेत असा तरुणाचा समज होता. तरुणाला जेव्हा रिटर्न मिळाले नाहीत तेव्हा तरुणीने आणखी 10 लाख गुंतवणूक करण्यास सांगितलं. यानंतर त्याने 3 लाख 95 हजार ट्रान्सफर केले. पण जेव्हा आपल्याला काहीच पैसे मिळत नाहीत हे लक्षात आलं तेव्हा आपली फसवणूक होत असल्याचं त्याला कळालं. 

देहू रोडच्या आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या या तरुणाने नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

बंगळुरुत टिंडवरुन महिलेची फसवणूक

मे महिन्यात बंगळुरुमधील एका 37 वर्षीय तरुणीची टिंडरच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली होती. तरुणी बंगळुरुतील एका खासगी कंपनीत कामाला आहे. आपली 4.5 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप तिने केला आहे. घोटाळेबाजाने महिलेला त्याच्या प्रेमात पाडले आणि आपण यूकेमध्ये राहत असून तिला भेटण्यासाठी भारतात येत असल्याचे तिला सांगितले होते. तरुणी त्याच्या बोलण्यात फसली आणि 4.5 लाख रुपये बँक खात्यात जमा केले. त्यानंतर महिलेने पैसे परत मिळतील या आशेने पोलिसांकडे धाव घेतली.