नागपूर : राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम नागपुरातही दिसून येत आहे. एसटीची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. मात्र दुसरीकडे खाजगी वाहतूक करणाऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरु असल्याने स्कूल बस संचालकांनी आपली वाहने प्रवासी वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. त्यामुळे बस डेपोच्या बाहेर खाजगी बसेसची झुंबड दिसून येत आहे.
खासगी बसप्रवासासाठी प्रवाशांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. नागपूर विभागातील एसटीचे सुमारे साडे तीन हजार कर्मचारी संपावर असल्याने प्रवासी वाहतुकीवर त्याचा भीषण परिणाम झाला आहे. सामान्य दिवसात नागपूर डेपो मधून एसटीच्या सुमारे बाराशे बसेसची ये-जा होत असून दरोरज ७० लाखांचे उत्पन्न त्यातून प्राप्त होते.
संपूर्ण राज्यासह मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश, छत्तीसगढ व तेलंगाना राज्यात नागपुरातून एसटी जातात.
मात्र संप सुरु झाल्यापासून एकीकडे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.त्यामुळे संपाची कोंडी फुटावी आणि यासाठी सरकारने प्रयत्न करावा हीच एक भावना संपकरी कर्मचारी तसे प्रवाशांची आहे.