न्यायमूर्ती झोपले असताना गाडी बाहेर काढली अन्....; नोकरी गेली, लाखांचा दंड; वाचा नेमकं काय घडलं?

Nagpur Crime : नागपुरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस विभागाने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याचे निलंबन करत दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

आकाश नेटके | Updated: May 23, 2023, 01:13 PM IST
न्यायमूर्ती झोपले असताना गाडी बाहेर काढली अन्....; नोकरी गेली, लाखांचा दंड; वाचा नेमकं काय घडलं? title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : न्यायमूर्तींच्या (High Court judge) बंगल्यात तैनात एका पोलीस शिपायाला (Nagpur Police) त्यांची कार निवासस्थानातून काढून शहरात फटका मारण्याचा प्रताप चांगलाच महागात पडला आहे. या पोलीस शिपायावर आता बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले. पोलीस हवालदाराल नोकरी गमावण्यासोबत दोन लाखांचा भुर्दंड देखील बसला आहे. त्यामुळे आता निलंबनानंतर मिळणाऱ्या रकमेतून न्यायाधिशांना दोन लाखांचा दंड द्यावा लागणार आहे.

नागपूर पोलीस दलातील 2016 च्या तुकडीतील शीपाई अमित झिल्पे हा पोलीस कर्मचारी पाच एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून तैनात होता. मध्यरात्रीनंतर न्यायाधीशांना काहीही कळणार नाही असा विचार करून अमित झिल्पेने न्यायाधीशांची खाजगी कार बंगल्याबाहेर काढली आणि न्यायाधीशांच्या निवासाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून तो नागपूर शहरात कार मध्ये फेरफटका मारण्यासाठी निघून गेला.

मात्र दुर्दैवाने वायुसेना नगर भागात एका विजेच्या खांबावर पोलीस हवालदाराने ही कार ठोकली. त्यामध्ये कारचे प्रचंड नुकसान झाले. घाबरलेल्या अमित झिल्पेने रात्रीच्या अंधारातच ती कार पुन्हा न्यायाधीशांच्या बंगल्यावर आणली आणि होती त्या ठिकाणीच उभी केली. मात्र सकाळी न्यायाधिशांना जाग आल्यानंतर त्यांना धक्कास बसला. कारचे जबरदस्त नुकसान झाल्याचे पाहून त्यांनी विचारपूस सुरु केली. रात्री बंगल्याच्या पोर्चमध्ये सुरक्षितरीत्या उभी केलेली कार सकाळी अशी अपघातग्रस्त कशी काय झाली असा प्रश्न त्यांना पडला.

न्यायाधिशांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ न्यायाधिशांच्या बंगल्यावर धाव घेतली आणि तपास सुरु केला. पोलिसांनी न्यायाधीशाच्या बंगल्याच्या बाहेरील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्या सुरुवात केली.. सीसीटीव्ही फुटेजमध्ये न्यायाधीशांची कार मध्यरात्री रस्त्यांवर धावताना दिसली. रात्री बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी अमित झिल्पे याकडे पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. कार आपणच फेरफटका मारण्यासाठी बंगल्या बाहेर काढण्याची कबुली अमिल झिल्पे याने दिली.

दरम्यान, या प्रकारानंतर अमित झिल्पे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. सुरुवातीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमित झिल्पेला निलंबित केले होते. मात्र, त्याची कृती पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणारी असल्याने आता त्याची पोलीस दलातून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कर्तव्यावर कसूर करणाऱ्या बडतर्फ अमितच्या निवृत्तीच्या रकमेतून कार दुरुस्तीसाठी दोन लाख 28 रुपयांचा खर्च वसूल करण्याचे निर्देशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.