'मम्मी मला दवाखान्यात घेऊन चल...', चिमुरडा ओरडत राहिला पण मांत्रिक मारत राहिला; 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sangli Crime : सांगलीतल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आलेली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे

आकाश नेटके | Updated: May 23, 2023, 11:52 AM IST
'मम्मी मला दवाखान्यात घेऊन चल...', चिमुरडा ओरडत राहिला पण मांत्रिक मारत राहिला; 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू title=

प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : भूतबाधा (demon possession) काढण्यासाठी मांत्रिकाने बेदम मारहाण केल्याने जखमी होऊन एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या (Sangli Crime) मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मुलाचा मृत्यू झाला आहे. मांत्रिकाकडून झालेल्या मारहाणीमुळेचं मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मात्र मृत्यूचा नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस (Sangli Police) पुढील तपास करत आहेत.

मारहाणीनंतर दवाखान्यात केले दाखल

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या इरळी येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाचा कर्नाटकातल्या एका मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत मुलाला गेल्या काही दिवसांपासून सतत ताप येत होता. हा कोणता तरी भूतबाधेचा प्रकार आहे असा संशय मुलाच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण झाला होता. यातून मुलाला कर्नाटक राज्यातल्या कुडची गावानजीकच्या शिरगुर या ठिकाणी एका मांत्रिकाकडे नेलं होतं. त्यावेळी या मांत्रिकांने मुलाच्या याच्या अंगात भूत शिरल्याचे सांगत मांत्रिकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाला गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचार सुरू असताना आर्यन याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन शहर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना याबाबतच्या तपास करण्याचे निवेदन दिले आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ पोलिसांच्याकडून मुलाच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही घटना कर्नाटक राज्यातल्या कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून,प्राथमिक तक्रार घेऊन पुढे कुडची पोलीस ठाण्याकडे ती वर्ग करण्यात येईल,असं कवठेमहांकाळ पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मृत मुलाचा शवविच्छेदनाचा अहवाल अजून येणे बाकी आहे. त्याबाबतचे व्हिसेरा, राखून ठेवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मुलाला खोलीत नेऊन मारहाण

"मुलाला दम लागल्यासारखे होत असल्यामुळे त्याला दवाखान्यात दाखवले होते. मात्र भाऊजयीने मांत्रिकाकडे दाखवण्यास सांगितले. त्यानुसार त्या मांत्रिकडे घेऊन गेले होते. तिथे काय झालं मला काहीच माहिती नाही. मुलाला कोणीतरी धरलंय असं त्या मांत्रिकाने सांगितले आणि आतमध्ये नेऊन मारहाण केली. मुलाला मांड्यांवर, कानावर आणि पाठीत मारले होते. मांत्रिकाने मारल्यामुळे मुलाचा मृत्यू झालाय असे डॉक्टरांनी सांगितले. मम्मी मला दवाखान्यात घेऊन चल असे मुलगा म्हणत होता," असे मृत मुलाच्या आईने सांगितले.