घरातून लग्नासाठी निघाली पण परतलीच नाही.... 40 दिवसांपासून बेपत्ता महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

Crime News : 40 दिवसांनी याप्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. सखोल तपासानंतर महिलेच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Updated: Jan 16, 2023, 01:03 PM IST
घरातून लग्नासाठी निघाली पण परतलीच नाही.... 40 दिवसांपासून बेपत्ता महिलेच्या हत्येचे गूढ उकलले title=

Crime News : वर्धा जिल्ह्यातील (wardha crime news) तळेगाव श्यामजीपंत येथील सत्याग्राही घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकललं आहे. गेल्या वर्षी सत्याग्राही घाटात (satyagrahi ghat) एका अज्ञात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता ही हत्या असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी (wardha police) तपास सुरु केला होता. मात्र सुरुवातीचे दहा दिवस कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. मात्र  सखोल तपासानंतर महिलेच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

ज्योत्सना मनीष भोसले (32) रा. मंगरूळ चव्हाळा,  अमरावती असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 10 डिसेंबर रोजी भीमराव रमेश शिंगारे यांना एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र महिलेची ओळख पटत नसल्याने तपास करणे कठीण होऊन बसले. कोणताही पुरावा न मिळाल्याने वर्धा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके, तळेगाव पोलिसांची 2 आणि आर्वी पोलिसांचे 1 अशा एकूण सहा पथकांद्वारे तपास सुरु केला.

3000 महिलांचा तपास

पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत महिलेच्या शरीरावर आढळलेल्या जखमा, महिलेची चप्पल, कपडे याद्वारे पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा तसेच मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तपास सुरु केला. मृतदेह जळालेल्या अवस्थेतील असल्याने एका पथकाने केवळ पेट्रोल पंपावर जात तपास सुरु केला. दुसऱ्या पथकाने केवळ बेपत्ता झालेल्या 3000 महिलांचा मतदार यादीद्वारे तपास करण्यात आला. यामध्ये आशा वर्कचीही मदत घेण्यात आली.

मृतदेहाच्या कपड्यांवरुन पटली ओळख 

दुसरीकडे ज्योत्सना भोसले लग्नासाठी गेल्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसात दिली होती. त्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी ज्योत्सना यांचा तपास सुरु केला होता. याची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी ज्योत्सना यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेहजवळ आढलेले कपडे आणि चप्पल ज्योत्सना यांच्या आईला दाखवण्यात आल्या. त्यांनी ते सर्व साहित्य ज्योत्सना यांचे असल्याचे सांगितले आणि या हत्येचा उलघडा झाला.

वर्धा पोलिसांचा मध्य प्रदेशापर्यंत तपास

"जळालेल्या अवस्थेत एका 30 ते 40 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही हत्या असल्याचे समोर आले. त्यानुसार आम्ही कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये सुरुवातीला कोणतीही माहिती नव्हती. मयत महिला कोण आहे, खून कोणी केला याबाबत कोणताही पुरावा नव्हता. घटना घडली त्या ठिकाणी पूर्णपणे जंगलाचा परिसर आहे. सुरुवातीचे दहा दिवस पोलिसांनी तपास केला असता कोणतीही माहिती हाती लागली नाही. यानंतर तपासासाठी सहा पथके तयार करण्यात आली. या पथकांनी नागपूर पासून अमरावतीपर्यंत सर्व पेट्रोल पंपावर जाऊन तपासणी केली. यासोबत 3000 हरवलेल्या व्यक्तींसोबत महिलेचे प्रकरण तपासून पाहण्यात आले. तसेच मध्य प्रदेशातील जिल्ह्यांमध्येही तपास करण्यात करण्यात आला," अशी माहिती वर्ध्याचे पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी दिली.

कोणी केला खून?

दरम्यान, पतीनेच या महिलेची हत्या केल्याचे उघड झाले आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची सत्याग्रही घाटात दगडाने ठेचून जिवंत जाळले होते. पोलिसांनी याप्रकरणी पती मनीष भोसले आणि त्याचा मावस भाऊ प्रवीण पवार याला अटक केली आहे. महिलेचा पती हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, दारुबंदी आदी विविध गंभीर असे दहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.