घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ

Mumbai Hording Accident: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 14, 2024, 12:32 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ title=
भाजपा आमदार राम कदम यांनी पोस्ट केला फोटो

Mumbai Ghatkopar Hording Accident Update: मुंबईमध्ये सोमवारी (13 मे 2024 रोजी) वादळी वाऱ्यामुळे भल्या मोठ्या आकाराचं होर्डिंग घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर पडून 14 जण दगावले. या अपघातामध्ये 65 हून अधिकजण जखमी झाले आहेत. सदर प्रकरणावरुन आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच दुसरीकडे राजकारणही सुरु झालं आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या होर्डिंगची मालकी असलेल्या जाहिरात कंपनीच्या मालकाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. कदम यांनी ठाकरे आणि या व्यक्तीचा फोटोही पोस्ट केला आहे.

उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो

घाटकोपरमधील अपघातानंतर ज्या जाहिरात कंपनीच्या मालकीचं हे होर्डिंग होतं तिचा मालक असलेला भावेश भिडे संपूर्ण कुटुंबासहीत फरार झाला आहे. त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच आता राम कदम यांनी भावेशचा उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. "14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे..  श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात," अशी कॅप्शन देत राम कदम यांनी हा फोटो शेअर केला आहे.

नक्की वाचा >> 14 मृत्यू, 6 कोटींचा दंड, वर्षभरापूर्वीचा FIR... होर्डिंग अपघातावरुन BMC-रेल्वेमध्ये जुंपली

कुठे फेडणार हे पाप?

"मनाला चीड आणणारे हे चित्र, त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते," असंही राम कदम यांनी म्हटलं आहे. "टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर, आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?" असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. 

राऊतांनी दिलं उत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा आणि शिंदे गटच अपघाताला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. "मुंबई महापालिकेमध्ये शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपाचं राज्य आहे ना? प्रशासनाचं राज्य आहे ना? बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या अडीच तीन वर्षांपासून कोणाचंही राज्य नाही. मुंबईत भाजपा-शिंदे गट प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे. त्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला तेच जबाबदार आहेत," असं खासदार राऊत म्हणाले आहेत. 

ती जमीन कोणाच्या मालकीची?

या होर्डिंग प्रकरणावरुन मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेदरम्यान जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या जमीनीवर होर्डिंग उभं होतं ती जमीन कोणाच्या मालकीची आहे यावरुन वाद सुरु झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार ज्या जमिनीवर हे होर्डिंग उभं होतं ती रेल्वे प्रशासनाच्या मालकीची असून त्यांनीच या होर्डिंगसाठी परवानगी दिली होती. मात्र या दाव्यानंतर रेल्वेने हा दावा फेटाळला असून आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी हे होर्डिंग उभारण्यात आलं तेव्हा काही झाडं कापण्यात आली होती. त्याविरोधात मागील वर्षीच मे महिन्यात पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता असं सांगितलं आहे. आता या जमिनीच्या मालकीवरुन रेल्वे आणि महानगरपालिकेकडून परस्पर विरोधी दावे केले जात आहेत.