Mumbai BEST Bus Accident: मुंबईतील लालबागमध्ये रविवारी रात्री बेस्टची बस गर्दीत घुसून एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये नुपूर नाम्बियार या 27 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूनंतर तिचं लालबागचा राजा या गणपती मंडळाशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे. नपूरही ही प्राप्तिकर विभागामध्ये कार्यरत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूने घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये लालबाग, काळाचौकी, परळमध्ये मोठ्या प्रमाणाच गर्दी असते. गणेशोत्सवापूर्वीचा हा अखेरचा रविवार असल्याने इथे 1 सप्टेंबर रोजीही मोठी गर्दी होती. त्याचवेळी रात्री साडेआठच्या सुमारास 66 क्रमांकाची बस अचानक रस्त्याच्याकडेला असलेल्या पदचाऱ्यांना उडवलं. एका मद्यपान केलेल्या प्रवाशाने सिग्नलवर गाडी थांबवण्यास सांगण्यावरुन चालकाशी वाद घालत थेट स्टेअरिंगला हात घातल्याने हा विचित्र अपघात घडला. चालक कमलेश प्रजापतीने गाडी थांबवावी अशी या मद्यपी प्रवाशाची मागणी होती. या प्रवाशाने चालकावर धावून जात त्याला धक्काबुक्की करत थेट स्टेअरिंग हातात घेतल्याने बसने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चालणाऱ्यांना धडक दिली. या धडकेमध्ये 9 जण जखमी झाले. याच जखमींपैकी एक असलेल्या नुपूरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, नुपूर गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये लालबागमध्ये स्वयंसेवक म्हणजेच व्हॉलेंटीयअर म्हणून काम करायची. त्यासाठी ती लालबागचा राजाच्या मंडळाकडून यंदाच्या वर्षी मंडळाने जारी केलेलं स्वयंसेवकाचं ओळखपत्र घेऊन घरी परत येत असतानाच हा दुर्देवी अपघात घडला. नुपूरने ज्या अपघातामुळे प्राण गमावला तो अपघात मद्यपान केलेला प्रवासी दत्ता शिंदेला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.
नुपूर चिंचपोकळीमधील मुक्ताई बावला कंपाऊंडमध्ये आई आणि बहिमीबरोबर राहत होती. ती तिच्या एका मित्राबरोबर लालबागला आली होती. तिथून व्हॉलेंटीअरचं आयकार्ड घेऊन ती दुचाकीवरुन परत जात असातना बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या नुपूरचा मृत्यू झाला. नुपूरचं लग्नही ठरलं होतं. दिवाळीनंतर ती लग्न करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. नुपूर ही घरातील एकमेव कमवती व्यक्ती होती. वडिलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी तीच संभाळत होती. ती कारकून म्हणून प्राप्तिकर विभागामध्ये काम करुन कुटुंबाचा उदर्निवाह चालवत होती. तिच्या निधनामुळे तिच्या आई आणि बहिणीला मोठा धक्का बसला असून मनमिळावू नुपूरच्या अशा अचानक एक्झिटमुळे ती राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.