ऐन गणेशोत्सवात एसटी बंद! कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे गावाकडे जाणाऱ्या बस डेपोतच

ST News in Marathi: ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दाखल सरकार घेत नसल्याने लालापरीची चाक थांबल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 3, 2024, 08:54 AM IST
ऐन गणेशोत्सवात एसटी बंद! कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे गावाकडे जाणाऱ्या बस डेपोतच title=
st mahamandal bus employee hold kam band andolan from 3 sep in maharashtra

ST News in Marathi: ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं  आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पहिला दिवस आहे. एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळं डेपोत बस उभ्याच आहेत. त्यामुळं याचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे. या आंदोलनामुळं राज्यभरात एसटी बस बंद राहण्याची शक्यता आहे. मुंबई सेंटर येथील ST बस डेपोमध्ये या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळतेय. 

गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते. अनेकांनी गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षणदेखील केले आहे. अशातच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होणार आहे. राज्यभरात या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळतंय. साडे सातची एसटी बस होती. मात्र एक-दीड तास होऊनही बस डेपोतच होती. त्यानंतर प्रवाशांना ही बस कुठेही जाणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळं प्रवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे. सरकार आणि प्रशासनामध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. दोन महिन्यांआधी रिझर्व्हेशन करुनही अशी अवस्था असल्याचा संताप प्रवाशांनी केला आहे. 

पुण्यातही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पुण्यातही एसटी कर्माचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट बस स्थानकातून बाहेर गावी जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. रात्रीसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार आहेत. ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉप मधील जवळपास 500 च्यावर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तसंच, स्वारगेट स्थानकात पोलिस बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे. 

रायगडात एसटी आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद

एस टी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी कामावर हजर आहेत. सर्वच आगारातून सकाळ पासूनच्या नियमित फेऱ्या सुरू आहेत.

अकोल्यातून एसटी बस सेवा ठप्प

अकोल्यात एस टी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. अकोल्यातील आगर क्रमांक 1 आणि 2 मधून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ST कर्मचारी संघटनाकडून  काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचे होल होणार हे निश्चित आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. राज्यभरात बैठकांचे सत्र राबवून 3 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला होता.