Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे यांनी लावून धरला. यासाठी आंदोलने केली, मोर्चे काढले, सभा घेतल्या, उपोषण केले. सरकारला वेठीस धरले. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यानंतर विधानसभा निवडणुका आल्या. आता त्यांचे निकालही लागले आहेत. यात महायुतीला यश मिळाले असून 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
मराठा आरक्षणासाठी इथून पुढचे सामुहीक आंदोलन मुंबई येथे होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देवून आरक्षण घेणार असा ईशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदारसुद्धा निवडून आणले. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्यात नव्हतो. नाहीतर सुफडा साफ केला असता, असे ते म्हणाले.
यापुढे आरक्षणासाठी सामुहीक उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावरती होऊ शकते. आरक्षणाची चळवळ थांबवणार नसल्यांचं जरांगे पाटील यांनी तुळजापूरात माध्यमांशी बोलताना सांगितले.
एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाहीत. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचंही मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना…, असं मनोज जरांगे म्हणालेत.मराठा आरक्षणावर त्यांनी पुन्हा सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. 'सरकारला जाहीरपणाने सांगतो मराठा आरक्षण द्यायचं नसले तर पुन्हा छाताडावर बसणार. गुडघ्यावरच टेकवणार तुम्हाला. कुणाचाही सत्ता आली तरी आम्हाला संघर्ष करावच लागणार. पण हुरळून जायचं नाही मराठ्यांना छेडायचं काम करायचं नाही. सत्तेत आले म्हणून दादागिरी करायची हे मराठ्यांपुढे चालणार नाही. नसता भोग भोगावे लागतील. चांगले लोकं निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. मराठ्यांशिवाय राज्यात कुणाचीही सत्ता येवू शकत नाही. आता मराठ्यांनी दिलं तर मराठ्यांना द्यायचं. मराठ्यांना मणगट लावायचं काम करायचं नाही. मराठ्यांच्या नादी लागणं सोपं आहे का? मीच मराठा समाज आझाद करून सोडला. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. कुणाचं सरकार आलं आम्हाला काही देणं घेणं नाही. मैदानात असतो तर धुरळा वाजवला असतो' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.