भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; VIDEO व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, 'ते फोल्डर विधानसभेतील...'

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरु आहे. यादरम्यान सभागृहातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा (Meghana Bordikar) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 12, 2024, 02:58 PM IST
भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; VIDEO व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, 'ते फोल्डर विधानसभेतील...' title=

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरु आहे. त्यातच आज विधानपरिषदेची निवडणूक सुरु असल्याने सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान सभागृहातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा (Meghana Bordikar) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. 

व्हिडीओत दिसत आहे की, भाजपा आमदार राजेश पवार सभागृहात बोलत आहेत. यावेळी मेघना बोर्डीकर मागील बाकावर बसलेल्या आहेत. यावेळी त्या एका फाईलवर स्वाक्षरी करतात. स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील दोन नोटा फाईलमध्ये ठेवतात. 

औषधं आणण्यासाठी पैसे ठेवले, मेघना बोर्डीकरांचा दावा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली. औषधं आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते असा दावा त्यांनी केला आहे. "सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

विधानपरिषेदत आज मतदान

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान सुरु आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे एका जागेवर कुणाचा गेम होणार आणि कोण बाजी मागणार याकडे लक्ष लागलं आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा आहे. त्यामुळे मविआ किंवा महायुतीच्या एका उमेदवाराचा गेम होणार आहे. हा उमेदवार कोण आहे ते आजच स्पष्ट होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला  आहे. भाजपा आणि समर्थक असे 100 आमदारांनी मतदान केलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटातील आमदारांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे आतापर्यंत 222 आमदारांनी मतदान केलं आहे. 

आत्तापर्यंत झालेलं मतदान

भाजप-100
अपक्ष-9
अजित पवार गट-39 + अपक्ष 2= 41
शिंदे गट-30
काँग्रेस-30
शरद पवार गट-12