'त्यांचा राजकीय सोहळा होऊ द्या, मग...'; उद्धव ठाकरेंना अयोध्येला न बोलवल्याने संतापले संजय राऊत

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 22, 2023, 01:12 PM IST
'त्यांचा राजकीय सोहळा होऊ द्या, मग...'; उद्धव ठाकरेंना अयोध्येला न बोलवल्याने संतापले संजय राऊत title=

Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य मंदिरात रामललाला प्रतिष्ठित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. तसेच सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रित केले गेले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण देण्यात आले नाही.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्येत देशभरातून मोठ्या संख्येने लोक जमतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी सप्टेंबर महिन्यात केला होता. त्यावेळी जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक विधान केले होते. "राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सरकार बस आणि ट्रकमधून मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करेल आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात गोध्रासारखी घटना घडण्याची शक्यता आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता देशभरातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना अयोध्येतील कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं असलं तरी यामध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव नाही. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. कारण त्यात आमचे योगदान आहे. ज्यांचे काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. राम मंदिर ही कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. राम मंदिर उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. यांनी बाळासाहेबांनाही बोलावलं नसतं. उद्धव ठाकरे अयोध्येत गेले तर तिथे पुन्हा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि शिवसेनेचा जयजयकार होईल," असे संजय राऊत म्हणाले.

"ज्यांचं खरंच योगदान आहे, त्यांना ते कधीच बोलावणार नाहीत. मात्र प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. ते एका पक्षाचे किंवा एका नेत्याची जहागीर नाही. त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊद्या, नंतर आम्ही जाऊन धार्मिक उत्सव करू," असंही संजय राऊत यांनी म्हणाले.

बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केले - दीपक केसरकर 

"मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि 370 कलम हटवून दाखवेन असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते आणि ते मोदींनी पूर्ण केले आहे. खर तर संजय राऊत यांनी मोदींचं कौतुक केलं पाहिजे. शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार ही बातमी संजय राऊत यांनी लीक केली होती. त्यावेळी गप्प राहिले असते तर युतीमध्ये फूट पडली नसती. राम मंदिर शुभारंभाचा सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आमंत्रण दिले आहे. त्यांना देखील दुसऱ्या टप्प्यात दिलं जाईल. हा कार्यक्रम समितीचा आहे आमचा नाही. भाजपा आणि शिवसेना युती ज्यांच्यामुळे तुटली त्यांना असल्या विषयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असे प्रत्युत्तर मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिले आहे.