मंत्रिपद नाही आम्हाला, निघालो आम्ही गावाला, मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी गाठलं गाव

मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज झालेत. या नाराज आमदारांची संख्या बरीच मोठी आहे. मंत्रिपदाच्या आशेवर नागपुरात गेलेले इच्छुक आता रुसून आपापल्या मतदारसंघात परत गेलेत. मतदारसंघात परत गेलेल्या आमदार लोकहिताशी प्रतारणा करत असल्याचा आरोप होऊ लागलाय.

वनिता कांबळे | Updated: Dec 17, 2024, 08:34 PM IST
मंत्रिपद नाही आम्हाला, निघालो आम्ही गावाला, मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी गाठलं गाव title=

Maharashtra Cabinet Expansion :  मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या सत्ताधारी आमदारांची संख्या मोठी आहे. यावेळी सरकारकडं भक्कम बहुमत असल्यानं पक्ष सोडून जाईन असा इशारा किंवा धमकी देण्याचीही सोय नाही. त्यामुळं नागपुरात मंत्रिपद मिळण्याच्या आशेवर आलेले आमदार अधिवेशन सोडून आपापल्या घरी निघालेत. 

छगन भुजबळ नाशिकला परतले, तानाजी सावंत पुण्याला परतले,  विजय शिवतरे सासवडला परतले, रवी राणा अमरावतीला परतले तर प्रकाश सोळंके माजलगावला परतले आहेत. आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगितलीयेत. राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी तर आपण मतदारसंघात काही महत्वाची कामं असल्याचं कारण दिलंय.

मंत्रिपद न मिळाल्यानं रुसलेल्या आमदारांच्या माघारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केलीय. अधिवेशनाचा दिवसाचा खर्च 13 कोटी तर आमदारांच्या मुक्कामाचा खर्च पन्नास कोटी आहे. असं असताना लोकप्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यानं अधिवेशन सोडून मतदारसंघात कसे जातात असा सवाल दमानियांनी विचारलाय.

मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडण्याची संधी अधिवेशनात असते. पण जनहिताला दुय्यम स्थान देऊन मंत्री वैयक्तिक स्वार्थ साधत असल्याची टीका या निमित्तानं होऊ लागलीये. अधिवेशनाचा कालावधी पाहता गावी गेलेले नाराज आमदार परत येण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज होत हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये दाखल झालेत. उद्या भुजबळ पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.  उद्या 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.