LokSabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीत काही जागांवरुन सुरु असलेला वाद मिटण्याऐवजी वाढत चालला आहे. ठाकरे गटाने सांगलीमधील जागेवर उमेदवार जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि त्यांच्यात तणाव आहे. त्यातच संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आलात तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय लढणार हे शिवसेनेचं धोरण आहे असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेला नाना पटोले यांनी उत्तर दिलं असून छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नका असा सल्ला दिला आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष सुरु आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सांगलीची जागा शिवसेनेची असून चंद्रहार पाटीलच लढणार आणि जिंकणार असल्याचा दावा आणि निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचं आहे अशी आठवण करुन देताना राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये असा टोला लगावला आहे.
"संजय राऊतांनी मर्यादा पाळाव्यात. त्यांनी आपली नौटंकी थाबांबवी. एक ते दोन दिवसांत सांगलीचा विषय सामोपचाराने मिटवू. संजय राऊत हे मोठे नेते आहेत, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करु नये," असा टीकावजा सल्ला नाना पटोल यांनी संजय राऊतांना दिला आहे.
"कोणत्याही परिस्थितीत देशात लोकशाहीविरोधात सरकार सत्तेत आलं नाही पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासाठी आम्ही काही परिणाम भोगावे लागले तरी तयार आहोत. अशा स्थितीत मोठ्या व्यक्तीने लहान कार्यकर्त्याप्रमाणे विधान करु नये," असं नाना पटोले म्हणाले आहेत.
"एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही"
ठएकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नाही. भाजपात त्यांचा छळ झाला असून, याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. ते स्वाभिमानी नेते आहेत, त्यामुळे असा निर्णय घेतील असं वाटत नाही," असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या जावयाला जेलमध्ये टाकलं. त्यांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. असं असताना ते भाजपात जातील असं वाटत नसल्याचं माझं मत आहे असं ते म्हणाले. नरेंद्र मोदींसारखे विश्वगुरु असताना त्यांना इतर पक्षातील नेते कशाला हवे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. निवडून येऊ शकत नसल्याने, आश्वासनं पूर्ण न केल्याने सर्व भ्रष्टाचारी लोकांना एकत्र केलं आहे. त्यांच्या माध्यमातून देशाची संपत्ती लुटण्याचं काम सुरु आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात देशासाठी काहीच बोलत नाही. गांधी कुटुंब, नेहरु कुटुंब यावरच बोलत असून, 10 वर्षांपासून हेच सांगत आहेत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही पण आपल्या मित्रांचं 16 कोटींचं कर्ज माफ केलं त्याबद्दल सांगितलं पाहिजे. दिशाभूल करण्याचं काम सुरु असून, जनतेलाही ते समजलं आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
"डमी तर भाजपाचे उमेदवार आहे. मी मतं मागणार नाही, लोकांच्या घरी जाणार नाही. मतं द्यायची असली तर देतील असं म्हणणारे आता कशाला मतं मागत आहेत. कोणत्याही उमेदवाला डमी म्हणत ते दिशाभूल करत आहे. भाजपाची विक्षिप्त मानसिकता लोकांना समजली आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जागा महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र आहे," असंही नाना पटोले म्हणाले.