PM Modi 6 Rallies In Next 2 Days See Full Schedule: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा आजचा दिवस प्रचाराच्या दृष्टीने वादळी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढील 48 तासांमध्ये राज्यात तब्बल अर्धा डझन सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षात असलेले शरद पवारही आज 2 सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा कसा असणार आहे पाहूयात...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या. आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाकडे आहे. त्यासाठीच आज मोदी पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा घेत आहेत.
मोदी आज सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपरी दीड वाजता होम मैदाना येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपाचे साताऱ्यातील राज्यसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी कराडमध्ये दुपारी पावणेचार वाजता सभा घेणार आहेत.
पुण्याचे माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी हडपसरमधील रेसकोर्स मैदानावर संध्याकाळी पावणेसहा वाजता मोदी सभा घेणार आहेत. मोदींची आजची पुण्यातील सभा ही 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी असेल.
उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. माढामधील उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे दुपारी पावणेबारा वाजता प्रचारसभा घेतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव येथे दुपारी दीड वाजता सभा घेणार आहेत. सुधाकर श्र्गांरे यांच्या प्रचारासाठी मोदी लातुरमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता सभा घेणार आहेत.
याशिवाय 6 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा बीडमध्ये होणार आहे. पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदी सभा घेतील. त्यानंतर 10 मे रोजीही पंतप्रधान मोदींच्या राज्यात सभा घेणार आहेत. कल्याणमधील महायुतीचे उमेदवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे, अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होतील.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. वाई इथे संध्याकाळी 4 वाजता होणा-या या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत. शरद पवारांची आजची दुसरी सभा संध्याकाळी 6 वाजता फलटणमध्ये होणार आहे. मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.