सरफराज सनदी, झी मीडिया सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्यासारखीच परिस्थिती निर्माण झालीय. सांगलीचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha Constituency) डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी मिरजच्या ज्या सभेत चंद्रहार पाटलांची घोषणा केली, त्या मेळाव्यावर काँग्रेसने (Congress) आधीच बहिष्कार टाकला होता. आता तर उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यावर काँग्रेस अधिकच नाराज झालीय.सांगली हा काँग्रेसचा लोकसभेचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र आता सांगलीत काँग्रेसच्या अस्तित्त्वाचाच प्रश्न निर्माण झालाय.
सांगली काँग्रेसचा बालेकिलिल्ला
1952 ते 2019 पर्यंत दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह 19 निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसने सोळा वेळा विजय साकारलाय. तर 1980 ते 2014 या काळात म्हणजे 34 वर्षात वसंतदादा पाटील घराण्याचंच या मतदारसंघावर वर्चस्व राहिलंय. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी प्रतिक पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली. मात्र विशाल पाटील यांना संजयकाका पाटील यांनी धुळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं
आता 2024 मध्ये शिवसेना कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा घेऊन मशाल पेटवू पाहतंय. मात्र उद्धव ठाकरेंनी परस्पर जाहीर केलेली उमेदवारी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार असलेले विशाल पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तेव्हा काहीही झालं तरी सांगलीतून काँग्रेसच लढणार असल्याचं ठामपणं सांगितलं जातंय.
सांगली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी वसंतदादा पाटील यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. िशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजाभाभी पाटील यांच्याशी संवादही साधला. मात्र हा संवाद उलटून काही तासही होत नाहीत तोच उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
एकीकडे सांगलीत भाजपने सलग दोनदा विजयी झालेले खासदार संजयकाका पाटील यांनाच पुन्हा तिकीट दिलंय. संजयकाका पाटील यांच्या प्रचाराला सुरुवातही झाली आहे. मात्र काँग्रेस आणि ठाकरेंची उमेदवारीवरुन कुस्ती सुरु आहे.. आता उमेदवारीवरुन सुरु असलेली मविआतली ही दंगल सांगलीत पुन्हा कमळ फुलवायला मदत करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.