कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा

कर्जत नगर परिषदेवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीने विजय मिळवला आहे.

Updated: Jan 28, 2019, 11:50 AM IST
कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा title=

रायगड -  कर्जत नगर परिषदेवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीने विजय मिळवला आहे. नगर परिषदेच्या एकूण १८ पैकी १० जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. नगराध्यक्षपदासाठीही युतीच्या उमेदवार सुवर्णा जोशी विजयी झाल्या आहेत. मतमोजणी सुरू झाल्यापासून सुवर्णा जोशी आघाडीवरच होत्या. सुरुवातीला १२०० मतांची असलेली आघाडी नंतर २५०० मतांवर जाऊन पोहोचली. त्यावेळीच त्यांचा विजय निश्चित झाला होता. 

या नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीवेळी पहिल्यापासूनच युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍड.  प्रतीक्षा लाड आणि शिवसेना-भाजप-आरपीआय युतीच्या सुवर्णा जोशी यांच्यात थेट लढत होती. त्यामध्ये अखेर शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांचा विजय झाला. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपालिका-परिषदा निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता.