मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या या ' सिक्रेट सुपरस्टार' पोलीस संघपाल तायडे यांचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
'खेळ मांडला' हे गाणं सोशल मीडियावर साऱ्यांच्याच पसंतीला पडलं. आता त्याच्या पाठोपाठ तायडे यांनी 'मेरे रश्के कमर' हे गाणं गाऊन पुन्हा एकदा साऱ्यांना अचंबित केलं आहे. हा व्हिडिओ देखील पहिल्या व्हिडिओ प्रमाणे नेटीझन्सच्या पसंतीला पडत आहे.
वाकोद येथील ग्रामसेवक अप्पा म्हणून जिल्हाभरात ओळख असलेल्या खुशाल तायडे यांचे संघपाल तायडे हे चिरंजीव आहेत. आई, दोन भाऊ असा तायडेंचा परिवार असून २००७ साली संघपाल पोलीस दलात भरती झाले. यापूर्वी त्यांनी ठाणे सेवा बजावली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी संघपाल तायडे, राजेश पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी शिर्डी येथे बंदोबस्त कामी ड्युटी लागली होती. यादरम्यान मनोरंजन म्हणून सहकाऱ्यांनी तायडे यास गाणे म्हणण्यास सांगितले. खेळ मांडला, दुष्काळ तसेच सैराट झालं जी असे तीन गाणे त्याने म्हटले. राजेश पाटील यांनी या गाण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. तायडे यांचा सोलापूर येथे पोलीस असलेला मित्र अभिजित मुळे यानेही तो सर्वत्र शेअर केला. या व्हिडीओने जगभरात धम्माल उडविली असून आतार्पयत १७ लाखापेक्षा अधिक जणांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. भारतासह अमेरिका कॅनडा, सिंगापूर या देशांमधूनही फोनवरुन नागरिक अभिनंदन, शुभेच्छांचे हजारो फोन आल्याचेही तायडे यांनी सांगितलं.