हिंगणघाट जळीत कांड : 'रुग्णालयाने पैसे मागितल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप खोटा'

 आम्ही पैसे मागितले नसल्याचे रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले 

Updated: Feb 5, 2020, 12:39 PM IST
हिंगणघाट जळीत कांड : 'रुग्णालयाने पैसे मागितल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप खोटा' title=

हिंगणघाट : हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुण शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा राज्यभरातून निषेध नोंदवला जात आहे. संतप्त हिंगणघाटकरांनी काल बंदची हाक दिली होती. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे यावरुन राजकारण होत असलेले पाहायला मिळत आहे. पीडितेच्या पालकांकडून ऑरेंज सिटी रुग्णालयाने पैसे मागितल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

पण आम्ही पैसे मागितले नसल्याचे रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर संवेदनशील विषयावर राजकारण केल्याचा ठपका ठेवत ट्रोल केले जात आहे. 

हॉस्पिटलचे 40 हजार सरकरकडून अजून भरले नाहीत. हॉस्पीटलने पैसे मागितले पण सरकारने दिले नाहीत असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. याप्रकरणी गृहखाते सपशेल अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रुग्णालयाला ४ लाख देण्याचे आश्वासन दिले आहे. पण आम्ही पैसे मागितले नाही. कृपया अफवा पसरवू नका असे डॉ. राजेश अटल यांनी सांगितले. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. स्वताचं अस्तित्त्व टीकवण्यासाठी चित्रा वाघ केवीलवाणा प्रयत्न करतायत. यावर राजकारण करताहेत असे चाकणकर म्हणाल्या.