अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 26, 2024, 03:23 PM IST
अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण title=

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. अजित पवार यांनी पुण्यातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन टाळलं आहे. अजित पवार या पूर्वनियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. इतकंच नाही तर दिवसभरातील दौराही रद्द केला असल्याची माहिती आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण अजित पवार याआधी काही वेळा नॉट रिचेबल झाले होते. पक्षांतर्गंत बंड पुकारण्याआधीही अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यामुळेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशी चर्चा रंगली आहे. 

पाण्याच्या टाकीच्या उद्धाटनावरुन वाद

पुण्यातील अशा नगरमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवाद रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या टाकीचं उद्घाटन आज होणार होतं. मात्र त्याला काँग्रेसने विरोध केला होता. ही पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी राहिली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच या टाकीचे उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते या टाकीचं उद्घाटन करण्यासाठी जायला निघाले. मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. 

यावेळी आमदार धांगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला. काही प्रमाणात झटापट देखील झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला येणार का याबद्दल उत्सुकता होती. पण अजित पवार यांनी दौरा रद्द करत वादापासून दूर राहणं पसंत केलं.