'मोदींना भेटून आल्यावर उद्धव ठाकरेना घाम फुटला, बाहेर येऊन 2 ग्लास पाणी प्यायले'

CM Eknath Shinde:  या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 17, 2024, 05:38 PM IST
'मोदींना भेटून आल्यावर उद्धव ठाकरेना घाम फुटला, बाहेर येऊन 2 ग्लास पाणी प्यायले' title=
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde: शिवसैनिकांचे खच्चीकरण केलं गेल. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. जगात असं धाडस कुणी करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कोल्हापुरात सुरु असलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 50 आमदार सोबत आले, पुढे काय होणार माहीत नव्हतं, बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सत्तेबाहेर जाण्याचा हा निर्णय घेतला. शिवसेना वाचवण्यासाठी तुम्ही काय केलं?सावरकरांचा अपमान झाला तेव्हा हिंदूत्व कुठे गेले होतं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला, 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय श्रीराम बोलुन भाषणाची सुरुवात केली. यावेळी लवकरच आपण सर्व अयोध्येला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. या महाअधिवेशनामुळे कोल्हापूरात भगवं वादळ आलय. शिवसैनिकांचे शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्ताने अवतरलय. अंबाबाईने दर्शन घेवूनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपण ही तेच केले.  बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेवुन जातोय म्हणून ही आज ती शिवसेना आहे. या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

शिवसेनेच्या या अधिवेशनात अनेक ठराव घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. किती तरी आमदार शिवसेनेत आलेत आणि येतायेत. हजारो लोकं येतायेत. कोणी इकडे आले की गद्दार आणि कचरा असे हिणवले जाते. हेच शिवसैनिक कचऱ्यात तुम्हाला जमा करतील, असे ते म्हणाले. 

मी मुख्यमंत्री झालो शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने झाले. आज आत्मपरीक्षण आत्मचिंतन कोणी केले पाहिजे? मी जिथे जिथे जातो तिथे लोकं का ? का लोकं उशीरा उशीरा पर्यंत थांबतात?  हे प्रेम आपुलकी पैसे देवून मिळवता येत नाही. हे कामातून वागण्यातून मिळत असते आणि म्हणुन आज पक्ष वाढतोय पुढे जातोय, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचे हिंदूत्व व्यापक आहे. आता हिंदूहृदय सम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? कॅांग्रेसला लांब ठेवयाला बाळासाहेब बोलले होते पण ते नंतर कॉंग्रेसला मांडीवर घेवुन बसल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना वाचवण्याकरता हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागले त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेब कोणा एकट्याचे नव्हते. ते बाळासाहेब शिवसैनिकांचे दैवत होते 
 यांना पक्ष प्रमुखांचा मोह 2004 पासून होता याचे अनेक साक्षीदार आहेत. शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा. हे मला ते सांगत होते तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणावले यांना मोह झालाय. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो 
 त्यांनी मला आधीच सांगितले असते तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहियेत. त्यामागे अनेक चेहरे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. 
 
माझा आवाज असा बंद करु नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलंय. हे मी संसदीय शब्द बोलतोय. मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही. मविआसोबत दिल्लीला गेले होते. मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते. हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागले त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. जर आमचे पाऊल चुकले असते तर तुम्ही आज आमच्या सोबत नसता. सत्तेवर आलो आणि शेतक-यांसाठीच पहिला निर्णय घेतला. वारकरी लोकं इतर पक्षातील लोकं शिवसेनेत येतायेत. तुमचा संपत्ती मला नको बाळासाहेबांचे विचार हिच आमची संपत्ती आहे. त्यांना बाळासाहेब नकोत त्यांना शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी रुपये दिले. 50 खोक्यांचा आरोप करताना यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. खुप गोष्टी आहेत माझ्याकडे बोलायचे वेळ आली की बाहेर काढेन. पवित्र मंदीर मातोश्रीची आता उदास हवेली झालीये, असेही ते म्हणाले.