Video : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?

Video : सचिनसमोरच रोहितची सही घेतली अन् छोटा फॅन तडक मागे फिरला; काहीतरी विसरला... पाहून क्रिकेटपटलाही हसू अनावर   

सायली पाटील | Updated: Jan 21, 2025, 09:56 AM IST
Video : अरे थांब... सही घेऊन घाईत मागे फिरलेल्या छोट्या फॅनला पासून रोहित शर्मा हैराण; तो खरंच सचिनला विसरला?  title=
(छाया सौजन्य- मुंबई इंडियन्स व्हिडीओ स्क्रीनग्रॅब) / Viral video small Fan Takes Rohit sharmas Autograph forgots bump he might Ignored Sachin at wankhede stadium

Viral Video : मुंबई हे शहर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. कैक वर्षांपासून असणारी ही ओळख इथूनही पुढे टीकून राहील. यामागं कारण ठरत आहे ते म्हणजे मागील कैक दशकांपासून या शहरानं देशाच्या संघाला दिलेले क्रिकेटपटू आणि सातत्यानं घडणारी नवी पिढी. आझाद मैदान, ओवल मैदान, वानखेडे, शिवाजी पार्क मैदान या आणि अशा अनेक ठिकाणांसह विविध जिमखान्यांच्या वतीनंही क्रिकेटची आवड असणाऱ्या असंख्य लहान मुलांपासून क्रिकेटप्रेमींना या खेळाचं रितसर प्रशिक्षण देत याच खेळात त्यांच्यासाठी करिअरच्या वाटा खुल्या करून दिल्या जातात. 

अशा या मुंबई शहरातील वानखेडे स्टेडियम या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी नुकताच एक मोठा सोहळा पार पडला. क्रिकेटच्या मैदानात सोहळा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण, यासाठी निमित्तही तसंच होतं. 19 जानेवारी 2025 रोजी वानखेडे स्टेडियममध्ये या मैदानाला 50 वर्षे पूर्ण होण्याचं औचित्य साधत एका दिमाखदार कार्यक्रमाचं आजोयन करण्यात आलं होतं. 

बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, विक्रमवीर सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुंबईकरांचा लाडका खेळाडू अजिंक्य रहाणे यांच्यासह इतरही मान्यवरांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. 

अतिशय महत्त्वाच्या अशा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेटप्रेमींनीसुद्धा वानखेडे स्टेडियम गाठल्याचं पाहायला मिळालं. याच सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या X पेजवर शेअर करण्यात आला. इन्स्टाग्राम, युट्यूबवरही हा व्हिडीओ अनेकांनीच शेअर केला. जिथं एक लहान क्रिकेटप्रेमी मुलगा मान्यवरांच्या रांगेत बसलेल्या रोहित शर्मापाशी येऊन आपल्या बॅटवर त्याची सही घेऊन गेला. 

हेसुद्धा वाचा : पुन:श्च नारायण मूर्ती; म्हणे 60 टक्के भारतीय मोफत अन्नधान्यावर अवलंबून, इतकं दारिद्र्य....

आवडीच्या खेळाडूसमोर उभं राहून आपण त्याची सही घेतोय याचा आनंद त्या मुलाच्या एकंदर देहबोलीतूनच झळकत होता. रोहितनंही उत्साहात त्याला सही दिली आणि तो fist-bump देणार इतक्यात हा चिमुकला तातडीनं तिथून मागे फिरला. रोहित तशीच मूठ घेऊन त्या मुलाकडे पाहत राहिला आणि त्याला त्याच हसू आलं. आपण काहीतरी विसरलोय, हे लक्षात येताच हा मुलगा परत तिथं आला. काहीही न करता त्यानं रोहितला fist-bump दिला आणि पुन्हा आनंदानं तो तिथून निघाला. 

सोशल मीडियावर हा घडला प्रकार प्रचंड व्हायरल झाला. आश्चर्याची बाब म्हणजे नेटकऱ्यांनी या व्हिडीओतील दृश्य तर पाहिली. पण सोबतच आणखी एक गोष्टसुद्धा हेरली. ती म्हणजे रोहितच्याच शेजारी क्रिकेटमधील देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही बसला होता. पण, त्याच्याकडे या मुलाचं लक्षच गेलं नाही. त्याचं त्या क्षणाचं सारं विश्व म्हणजे रोहित शर्माच होता आणि त्यालाच भेटण्याचा आनंद सोबत घेऊन तो माघारी गेला होता. मुंबई इंडियन्सकडून या व्हिडीओला CORE MEMORY असं कॅप्शन देण्यात आलं आहे.  या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?