ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुंबई -बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग होणार

Mumbai-Bengaluru Highway:मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास येथे भुयारी मार्गासाठी प्रशासनाचा हिरवा कंदील. किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 21, 2025, 10:25 AM IST
ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुंबई -बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग होणार title=
Mumbai Bengaluru Highway Underpass Finally Approved at Dehuroad

Mumbai-Bengaluru Highway: मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास येथे भुयारी मार्ग होण्यासाठी किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले आहे. कारण येथील भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड या मार्गावर शेकडो जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. त्यामुळे देहूरोड, किवळे, ग्रामस्थांनी आंदोलनाचा बडगा उचलला होता. यात अनेकांनी आंदोलन केली होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून या भुयारी मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी 21 कोटी 71 लाख 48 हजार 101 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा ही काढण्यात आली असून लवकरच भुयारी मार्गाचे काम चालू होणार आहे. 

देहूरोड मार्गावर आत्तापर्यंत सुमारे दीडशे निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे येथे भुयारी मार्ग होणे गरजेचं असल्याने किवळे ग्रामस्थांनी अनेक निवेदन दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आल्यावर ग्रामस्थांनी आंदोलनाचा बडगा हाती घेतला होता. अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आणि झोपी गेलेलं प्रशासन जागे झाले.

2014 सालापासून याचा पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर या लढ्याला यश आले आणि भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली. आता हा प्रश्न मार्गी लागला असल्याने किवळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. 

मुंबई-बंगळुरू महामार्ग चौदा पदरी होणार

मुंबई ते बंगळुरु या 14 पदरी महामार्गाचे काम सहा महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मुंबईतील अटल सेतूपासून हा महामार्ग सुरू होणार असून तो पुण्यातील रिंगरोडला जोडला जाणार आहे. त्यामुळं मुंबई ते बंगळूर हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. पुढे हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे. त्यामुळं पुणे ते औरंगाबाद हे अंतरही कमी होणार आहे.