Beed News Today: एकीकडे गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्या देशात चर्चेत आहे तर दुसरीकडे आता बीड जिल्ह्याच्या आष्टीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अफवांचा बाजार सुरू आहे. या अफवांचा आष्टीमधील एका कुटुंबाला मोठा मानसीक त्रास सहन करावा लागला आहे. एका अफवेमुळं एका संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा बीड चर्चेत आलं आहे.
बीडच्या आष्टीमधील एका कुटुंबांला HIVच्या अफवेमुळे वाळीत टाकण्यात आलं आहे. या कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला, तो मृत्यू HIVमुळे झाल्याची माहिती गावात पसरली आणि गावाने या कुटुंबाला वाळीत टाकलंय. मात्र ही माहिती खोटी असून पोलीस आणि वैद्यकीय अधिका-यांनी अफवा पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. मुलीचे सासरच्यांच्या सांगण्यावरून पोलीस आणि आरोग्य विभागाने अफवा पसरवल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे.
गावकऱ्यांनी कुटुंबाला वाळीत टाकल्याने या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर या त्रासातून महिलेनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात आलाय. पीडित कुटुंबाने डॉक्टर आणि पोलिसांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली आहे.
'खोटा आजार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळं आमच्या जवळ कोणी येत नाही. मुलंदेखील जवळ येत नाहीत. एड्स असल्याचे त्यांनी सांगितलं पण रिपोर्टमध्ये तसं काही नाही,' असं मृत तरुणीच्या आईने म्हटलं आहे. तर, 'आम्हाला बघितलं की लोकं लांब लांब जातात. आम्हाला एचआयव्ही आहे असं समजून आम्हाला वाळीत टाकण्याचा प्रकार केला आहे. सासरच्या लोकांवर आम्ही केस केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन पोलिस आणि डॉक्टरांना सांगून हा प्रकार केला आहे,' असं पीडितेच्या पालकांनी म्हटलं आहे.
मुलीचा मृत्यू झाला होता तिच्या सासरच्यांनी तिला मारहाण केली होती. माहेरवरुन पैसे आणावे म्हणून मारहाण केली होती, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केली होती. मुलीला बेदम मारहाण केल्यानंतर ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा आरोप सासरच्या मंडळींवर येऊ नये म्हणून अशा पद्धतीची अफवा पसरवल्याचा दावा मुलीच्या पालकांनी केला आहे.
धक्कादायक म्हणजे मुलीच्या अत्यंसंस्काराच्या वेळी पोलिसांच्या काही ऑडिओ क्लिपदेखील समोर आल्या आहेत. मुलीच्या अत्यंसंस्कारावेळी आलेल्या काही लोकांना पोलीस सांगत होते की तुम्ही मुलीच्या जवळ तर गेला नाहीत ना. तुम्ही ब्लड टेस्ट करुन घ्या, मुलीला एचआयव्ही होता, असं सांगतानाच्या ऑडिओ क्लिप समोर येत आहेत. मात्र त्या खऱ्या आहेत की खोट्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.