महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 3 हेक्टरपर्यंत...

CM Eknath Shinde on Unseasonal Rains: अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार.सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 29, 2023, 05:13 PM IST
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 3 हेक्टरपर्यंत...  title=
Cm eknath shinde gives relief to farmers Crops damaged by unseasonal rains

CM Eknath Shinde: अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं कोलमडून पडली आहेत तर, शेतीचेही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. (Unseasonal Rain In Maharashtra)

बुधवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. 

पालकमंत्र्यांना सरकारच्या सूचना

अवकाळीग्रस्त भागाला संबंधित सर्व पालकमंत्री भेट देतील तशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यापूर्वी जेव्हा अवकाळी गारपिटीमुळं नुकसान झालं तेव्हा सरकारने मदत केली आहे. सर्व पंचनाम्याचा अंदाज घेतल्यानंतर शेतकरी बांधवाना मदत दिली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पंचनामे  प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणारे सरकार आहे. हे सरकार काम करणारं आहे. घोषणा करुन फसवणारे नाही. एनडीआरएफच्या दुप्पट भरपाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 1 रुपयांमध्ये पिक विमा देण्याचा निर्णय घेतला, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.