छत्रपती संभाजीराजे रायगड प्राधिकरण चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

रायगड प्राधिकरणाचे ठेकेदार खाबुगिरी करत असल्याचा आरोप

Updated: Dec 29, 2019, 01:11 PM IST
छत्रपती संभाजीराजे रायगड प्राधिकरण चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=
फाईल फोटो

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकास आणि संवर्धनासाठी सरकारने कोटयवधींचा आराखडा तयार केला आहे. मात्र पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि ठेकेदारांची टक्केवारी यामुळे कामांना विलंब होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीराजे उद्विग्न झाले आहेत. 

खासदार छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी १२:३० मातोश्रीवर भेट घेणार आहेत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कारभारात गेली २ वर्षे ठेकेदार खाबूगिरी करत असल्यामुळे रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पण राज्यात नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्राधिकरणाच्या सर्व कारभाराबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज दुपारी १२:३० वाजता युवराज संभाजीराजे मातोश्रीवर येणार आहेत.

किल्ले रायगड...छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी...या ऐतिहासिक वास्तूला आलेली अवकळा दूर करण्यासाठी मागील सरकारने ६०६ कोटी रूपयांचा किल्ले रायगड विकास आराखडा तयार केला. यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापनाही करण्‍यात आली. 

पुरातत्व विभाग आणि प्राधिकरण यांनी कोणती कामं करायची हे यापूर्वीच निश्चित झालं आहे. तरीही अनेकदा परवानगी असतानाही प्राधिकरणाच्या कामांना पुरातत्व विभागाकडून अडवणूक केली जाते. दुसरीकडे प्राधिकरणाने परवानगी दिलेली नसतानाही रोपवे विस्तारीकरणाचं काम सुरु करण्यात आलं आहे. 

महाड ते रायगड रस्त्याचं काम एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं आहे. मात्र अजून हे काम सुरू झालेलं नाही. उलट त्यांनी हे काम साडे आठ टक्के घेऊन दुसऱ्याच ठेकेदाराला दिलं आहे. यात मृत्यूंजय पांडे नावाच्या दलालाला ५ टक्के देण्यात आल्याचा गंभीर आरोप संभाजीराजेंनी केला आहे. 

प्रशासनातील बाबूगिरी आणि खाबूगिरीतून स्वराज्याची राजधानीसुद्धा सुटलेली नाही. यासारखे दुसरं दुर्दैव असूच शकत नाही.