"बायकोने माझं वाटोळं केलं" पत्नी पीडित नवरोबांच्या पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या फेऱ्या

Vat Purnima 2023 : वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा सण साजरा केला जाते. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पतींतर्फे अनोखं आंदोलन करण्यात येत आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 2, 2023, 02:13 PM IST
"बायकोने माझं वाटोळं केलं" पत्नी पीडित नवरोबांच्या पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या फेऱ्या title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमाच्या (vat purnima 2023) एक दिवस आधी पत्नी पीडित आश्रमतर्फे पिंपळाच्या झाडासमोर फेरी पूजन करण्यात आलं आहे. पिंपळच्या झाडाला 121 उलटया फेऱ्या मारत उद्या यमराजाने पत्नीचे ऐकू नये यासाठी पूजन करण्यात आल्याचे पत्नी पीडित पुरुषांचे म्हणणे आहे. महिला पुरुषांना त्रास देतात मात्र त्यांना कुणीही वाली नाही, सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणून वट पौर्णिमेला पूजा करतात. मात्र त्याचा पुरुषाला त्रासच होतो. याचाच प्रतिकात्मक विरोध करण्यासाठी दरवर्षी पत्नी पीडित आश्रमातर्फे हे पिंपळ पूजन करण्यात येते. पत्नी पीडित अश्रमानुसार देशभरात त्यांचे दहा हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. या सगळ्यांना त्यांच्या पत्नीने छळला आहे आणि म्हणून याच सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी हे पूजन करण्यात आलं असल्याचं पत्नीपीडित संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले.

"बऱ्याच वर्षांपासून वटपौर्णिमा साजरी केली जाते.  वटवृक्षाला सात फेऱ्या मारुन सातजन्मी तोच नवरा मिळत असेल तर त्यामुळेच आम्ही पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारत आहोत. अशा भांडखोर बायका देण्यापेक्षा आम्हाला कायस्वरुपी मुंजा ठेव अशी प्रार्थना आम्ही पिंपळाकडे करतो. उलट्या फेऱ्या मारल्याने नक्कीच यमराज, मुंजा आमचेही ऐकेल आणि आमची सुटका करेल. बाहेरतर आमचं कोणी ऐकत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी साकडं घालत आहोत. आमच्याकडे 10 हजार पेक्षा जास्त पत्नीपिडीत सदस्यांची नोंद झाली आहे. सगळ्यांची समस्या ही पत्नी घरी नांदत नाही. पंतप्रधान आवास योजना सुरु झाल्यापासून घर दोघांच्या नावावर झाल्यानंतर पत्नी पतीला घरातून हाकलवून देते. त्यानंतर घरात सुद्धा येऊ देत नाही. पतीने प्रॉपर्टीमध्ये अधिकार द्यावा पण त्याने आपल्यावर अधिकार गाजवू नये असे पत्नीला वाटतं. आमच्या समस्यांची सुरुवात ही, पगाराचे पैसे बायकोला द्यायचे, खर्चासाठी पत्नीकडून पैसे मागायचे, आई वडिलांना बघायचे नाही, कोणाच्या घरी जायचे नाही, बायको सांगेल तिथे कितीही महत्त्वाचे काम असले तरी जायचे, अशा छोट्या छोट्या कारणांवरुन झाली. यामध्ये मानसिक, आर्थिक, शारिरीक आणि जेवढे काही त्रास आहेत ते सगळे झाले आहेत. ज्याला त्रास होतो त्यालाच हे समजते. या कायेदशीर लढाईमध्ये आतापर्यंत दोन ते अडीच कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारकडे आम्ही मागणी करतोय पण त्या पूर्ण होत नाहीत. ज्या प्रमाणे महिलांसाठी महिला आयोग आहे तसा पुरुषांसाठी पुरुष आयोग असावा. प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र असावं. पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती असवाली आणि एकतर्फी जे कायदे आहेत ते रद्द व्हावेत अशा आमच्या मागण्या आहेत," असे पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी म्हटलं आहे. 

"आमच्या बायका वटपोर्णिमा साजरी करुन वटवृक्षाला मागणी करतील की, सात जन्मांपर्यंत आम्हाला हाच नवरा पाहिजे. त्यामुळे यमराज उद्या बिझी राहतील. म्हणून एकदिवस आधीच पिंपळाला साकडे घालत आहोत. यमराजा, मुंजा खोटारड्या बायकांचे ऐकू नको. आमची या त्रास देणाऱ्या बायकांपासून सुटका व्हावी म्हणून आम्ही उद्या पत्नी सात फेऱ्या मारतील. त्यामुळे आम्ही आजच 121 उलट्या फेऱ्या मारत आहोत," असेही भारत फुलारे यांनी म्हटलं.